नंदुरबार : लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे पक्षांतर्गत मतभेद व मित्रपक्ष शिवसेनेशी असलेले मतभेद दूर करण्यास भाजपाने आघाडी घेतली आहे.निवडणूक जाहीर होण्यापूर्वी जिल्ह्यात भाजपा अंतर्गत मोठ्या प्रमाणावर मतभेद होते. विशेषत: जुने कार्यकर्ते व नवे कार्यकर्ते असा सरळ गट पक्षात होते. मात्र निवडणूकपूर्व टप्प्यात जिल्हाध्यक्षा व विद्यमान खासदार डॉ.हीना गावीत तथा आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी कार्यकर्त्यांमधील मतभेद दूर केले. आता निवडणूक जाहीर होताच मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेलाही जवळ करण्यात त्यांना यश आले आहे. गुरुवारी यासंदर्भात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ.विक्रांत मोरे व आमश्या पाडवी यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन ते जाहीर केले आहे. या पत्रकार परिषदेनंतर शिवसेनेतील कार्यकर्त्यांमध्येही उत्साह आला आहे. अर्थात आज जरी जाहीरपणे दोन्ही पक्षातील नेते युतीचा एकत्र प्रचार करण्याची भाषा करीत असले तरी मतदान होईपर्यंत ही मैत्री टिकून राहील का? याबाबत मात्र काही कार्यकर्त्यांमध्ये प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मतभेद दूर करण्यात भाजपाची सरशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 11:38 AM