नंदुरबार : निवडणुकीत अवैध दारू व पैशांचा महापूर रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस विभागातर्फे जिल्ह्याच्या सिमेवर सहा ठिकाणी नाकाबंदी पथक तैणात करण्यात आले आहे. याशिवाय आचारसंहिता पथक आणि पेट्रोलिंग करणारी वाहने नियमित गस्त घालणार आहेत.नंदुरबार जिल्हा दोन राज्यांच्या सिमेवर आहे. त्यामुळे आंतरराज्य सिमेवर निवडणूक काळात प्रशासनाला मोठी दक्षता घ्यावी लागते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी देखील प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे. जिल्ह्यात मध्यप्रदेशातून मोठ्या प्रमाणावर अवैध दारूची वाहतूक केली जाते. निवडणूक काळात त्याला अधीक जोर येतो. ही बाब लक्षात घेता आंतरराज्य सिमेवर सहा ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. या ठिकाणी सर्वच संशयीत वाहनांची कडक तपासणी करूनच ते सोडण्यात येणार आहेत. अवैध व बेहिशोबी पैशांवर देखील नजर ठेवली जाणार आहे. बँकांमधील मोठ्या व्यवहारांचे विवरण द्यावे लागणार आहे. तशा सुचना आधीच देण्यात आलेल्या आहेत.दरम्यान, जिल्ह्यातील अवैध मद्य विक्रीच्या ठिकाणी पोलिसांना तातडीने कारवाईच्या सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
अवैध दारू रोखण्यासाठी सहा ठिकाणी नाकाबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 12:30 PM