लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ढंपरमध्ये भरलेल्या वाळूची चाैकशी करणा-या मंडळ अधिका-याला चालकाने धक्काबुक्की केल्याची घटना शनिवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी ढंपरचालकाविरोधात गुन्हा दाखल आहे. नंदुरबार- वाका रस्त्यावर एमएच ४१ एयू ९७१२ या ढंपरमधून वाळू वाहून नेली जात असल्याचे दिसून आल्यानंतर मंडळाधिकारी अनेश जेमू वळवी यांनी त्यास थांबवून चाैकशी करण्याचा प्रयत्न केला. मंडळाधिकारी वळवी हे वाळू बाबत विचारणा करत असल्याचा राग येवून ढंपरचालक दिनेश पोपट सावकार रा. सटाणा याने त्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. तसेच मंडळा अधिकारी वसावे यांचा हात धरून ओढाताण केली. याप्रकरणी शनिवारी रात्री उशिरा मंडळाधिकारी वळवी यांनी उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन ढंपरचालक दिनेश सावकार याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गुजरातमधून नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वाळू वाहतूक सुरू आहे. नंदुरबार मार्गाने ही वाळू राज्यातील विविध भागात पाठवली जाते. या वाळू वाहतूकीवर जिल्हाधिकारी डाॅ. भारूड यांनी काही काळापूर्वी बंदी घातली होती. परंतू न्यायालयाने ही बंदी अवैध ठरवल्यानंतर ही वाहने पुन्हा जिल्ह्यातील रस्त्यांवरुन धावू लागली आहेत. भरधाव वेगात जाणा-या वाहनांमुळे अपघातांची मालिका सुरू असून शासकीय कर्मचा-यांनाही तपासणी करु दिली जात नाही.
मंडळाधिका-याला ढंपरचालकाकडून धक्काबुक्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 12:38 PM