लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : चरणमाळ-बोरझर जंगलात हरवलेल्या शहरातील २० वर्षीय तरुणाचा मृतदेह आज सकाळी मिळून आल्याने ३६ तासापासून सुरु असलेली शोध मोहीम थांबली. सोमवार सायंकाळ पासून हा युवक बेपत्ता होता़शहरातील दहा मुले रविवारी दुपारनंतर चरणमाळ- बोरझर जवळील जंगलातील काका काकू धबधब्यावर आंघोळीला गेले होते. तेथे मोहम्मद अब्दुल खालिक घरेय्या हा २० वर्षीय युवक बेपत्ता झाला होता. रविवारी सायंकाळी ही घटना समजल्यावर शोध मोहीम सुरु झाली होती. सोमवारी व्यापक स्तरावर ही मोहीम राबविण्यात आली. २०० लोकांनी वेगवेगळ्या गटात ही मोहीम राबवून चरणमाळ च्या जंगलाचा परिसर पिंजून काढला. शोध कार्यात ड्रोन चा ही वापर करण्यात आला. परंतु हे सर्व प्रयत्न मात्र निष्फळ ठरलेत. गुरे चारणाऱ्या गुराख्याला मंगळवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास केसबंद जंगल क्षेत्रातील बिलिआंबा जवळ बोरझर गावापासून सात किमी अंतरावर काकू धबधब्या जवळ नदी पात्रात तरंगणारा मृतदेह दिसला. धावतच जाऊन त्याने ही बाब बोरझरचे पोलीस पाटील भीमा गावीत यांना सांगितली. नवापूर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच उप निरीक्षक नासिर पठाण काही सहकाऱ्यांसोबत रवाना झालेत. तो मृतदेह हरविलेल्या मोहम्मदचा असल्याची ओळख पटल्यावर पंचनामा करून मृतदेह नवापूर येथे आणण्यात आले.नदी पात्र धरून सात किमीचे अंतर कापून बोरझरपर्यंत मृतदेह आणण्यासाठी स्थानिक नागरिक व शहरातील इस्लामपूरा येथील युवकांनी मोठे प्रयत्न केलेत. रुग्णालयात शव विच्छेदन केल्यानंतर सायंकाळी शोकाकुल वातावरणात युवकाच्या मृतदेहाचे दफनविधी करण्यात आले.
बेपत्ता युवकाचा मृतदेह आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 12:51 PM