प्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा ते डामरखेडा पुलावरून 200 टायर असलेले वाहन अवजड मशनरी घेऊन जाऊ शकत नसल्याने चक्क या वाहनासाठी गोमाई नदीतून खास कच्चा रस्ता तयार करण्यात आला आहे.सुरत येथून भरूच मार्गाने मशीन घेऊन निघालेले 200 टायरचे वाहन प्रकाशा, ता.शहादा येथे दाखल झाले आहे. या वाहनाला 12 चाकांच्या 17 रांगा आहेत. तर पुढील भागात मशीन ओढण्यासाठी तीन वाहने लावण्यात आली आहेत. या सर्वाची रुंदी सात मीटर तर लांबी 40 मीटर असून या वाहनाला एकूण 200 चाके आहेत. वीज निर्मिती करण्यासाठी लागणारी मशिनरी असलेले एका खासगी कंपनीचे हे वाहन शहाद्याहून शिरपूरमार्गे उज्जैन येथे जाणार आहे. प्रकाशा व डामरखेडा गावादरम्यान असलेला गोमाई नदीवरील पूल जीर्ण झाला आहे. त्यातच एवढे अवजड वाहन या पुलावरून घेऊन जाणे शक्य नाही. या पुलावरून हे वाहन जाऊही शकणार नाही. त्यासाठी पुलाच्या काही अंतरावरच गेल्या आठ दिवसांपासून नवीन रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे. गोमाई नदीपात्रात प्रकाशा बॅरेजच्या पाण्याचा फुगवटा असल्याने पाण्यातच रस्ता तयार करण्यात आला. खाली वाळूच्या गोण्या ठेवून त्यावर मुरुम टाकण्यात आला आहे. त्यावर लोखंडी प्लेट ठेवून हे वाहन जाणार आहे. या रस्त्यासाठी लागणारा सर्व खर्च संबंधित कंपनीने केला आहे. (वार्ताहर)गोमाई नदीपात्रात गेल्या आठ दिवसांपासून या रस्त्याचे काम सुरू असल्याने येणारे-जाणारे वाहनधारक व नागरिकांमध्ये तर्कवितर्क लावण्यात येत होते. प्रकाशा ते डामरखेडा दरम्यान असलेल्या पुलाच्या दुरुस्तीसाठी हा रस्ता तयार होत असल्याची चर्चा सर्वत्र होती. परंतु या रस्त्यावरून जाणारे अवजड वाहन प्रकाशा येथे दाखल झाल्यानंतर या वाहनासाठी हा रस्ता तयार करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाल्याने पूल दुरुस्ती व इतर चर्चाना पूर्णविराम मिळाला आहे.
200 टायरच्या वाहनासाठी नदीवर पूल
By admin | Published: February 14, 2017 12:25 AM