n लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लोणखेडा, ता.शहादा येथे बंटी और बबलीने घरात घुसत महिलेला चाकूचा धाक दाखवून रोख रक्कम रुपये लंपास केल्याची घटना ८ रोजी रात्री नऊ वाजता घडली. याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, भर वस्तीत घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. बंटी और बबली चित्रपटाला शोभेल असा प्रकार लोणखेडा येथे ८ रोजी रात्री घडला. नंदलाल दिलीप पाटील, रा.बॅंक ऑफ इंडिया जवळ यांच्या घरात रात्री नऊ ते साडेनऊच्या दरम्यान दुचाकीवर एक जोडपे आले. घराच्या पुढील हॅालमध्ये पाटील यांची आई लताबाई पाटील या बसलेल्या होत्या. तर पुढील रुममध्ये नंदलाल पाटील व परिवार टीव्ही पहात होते. दुचाकीवर आलेल्या दोघांनी थेट घरात प्रवेश केला. लताबाई यांना कुणी पाहुणे आले असतील म्हणून त्यांनी त्यांच्याकडे पाहिले. परंतु तोंडाला स्कार्फ बांधलेल्या महिलेने व पुरुषाने लताबाई यांना काही कळण्याच्या आत त्यांना चाकूचा धाक दाखविला. अंगावरील दागीने काढून देण्याचे सांगितले. कपाटाच्या चाव्या मागितल्या. लताबाईंनी हाताच्या इशाराने पाकिट दाखविले. यावेळी त्यांनी लताबाई पाकिटात असलेले साडेतीन हजार रुपये त्यांनी काढून घेतले.सोने काढून द्यावे म्हणून मारहाण देखील केली. कपाटाकडे दोघे जाणार तोच त्यांना घरात कुणीतरी असल्याची चाहुल लागली. त्यानंतर ते तेथून पसार झाले. परिवारातील सदस्य हॅालमध्ये आल्यावर त्यांना लताबाईच्या तोंडात कापडाचा बोळा दिसला. लागलीच पाटील यांनी दोघांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु उपयोग झाला नाही. त्यानंतर शहादा पोलीस ठाण्यात नंदलाल पाटील यांनी फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून अंदाजे ४० वर्षीय जोडप्याविरुद्ध जबरी चोरी व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार विक्रांत कचरे करीत आहे. लोणखेडा परिसरात गेल्या काही दिवसांपासून भुरट्या चोऱ्या, दुचाकी लंपास करण्याचे प्रकार वाढले आहेत. आता तर थेट बंटी-बबली बनून जबरी चोरी करण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे लोणखेडा येथे पोलीस चौकीची मागणी होत आहे.
‘बंटी और बबली’ स्टाईल दोघांनी केली जबरी चोरी, महिला जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 12:36 PM