मनोज शेलार
नंदुरबार : शहादा तालुक्यातील पुसनद येथे एकाच रात्रीतून पाच ठिकाणी घरफोडी झाली. यात जवळपास १५ लाखाचा मुद्देमाल लंपास झाल्याचा अंदाज आहे. गावात प्रथमच अशा प्रकारे धाडसी चोरीची घटना घडल्याने गावासह पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे. दरम्यान, श्वान पथक, ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनीही गावात भेट दिली.
पुसनद तालुका शहादा येथील शरद बाबू पाटील, सुनिता हिरालाल पाटील, सुनीता काशिनाथ पाटील, मीराबाई आनंदा कोळी आणि चुनीलाल पुना मिस्तरी यांच्या बंद असलेल्या घराचे कुलूप तोडून ही चोरी करण्यात आली. गुरुवारी पहाटे दोन ते साडेतीन वाजेच्या दरम्यान ही चोरी झाल्याची शक्यता आहे.
शरद बाबू पाटील हे गुजरात येथे आपल्या परिवारासह गेले होते. त्यामुळे त्यांच्या घराला कुलूप लावले होते. तसेच सुनिता हिरालाल पाटील ह्या शहादा येथे उपचार घेण्यासाठी खाजगी दवाखान्यात दाखल होत्या. चोरट्यांनी ही पाचही घरे फोडली. सुमारे १५ लाखापेक्षा अधिकचा ऐवज चोरीस नेला. भुंकणाऱ्या श्वानालाही चोरट्यांनी जखमी केले.