नंदुरबार : मातीची किंमत ती काय? परंतु तीच माती आज कुंभार व्यावसायिकांच्या उद्योगावर परिणाम करणारी ठरली आहे. नंदुरबारसह परिसरात मटके तयार करण्यासाठी लागणारी मातीच मिळत नसल्याने यंदा अक्षय्यतृतीयेसाठी लागणारे मडके आणि माठ तयारच करण्यात आले नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे येथील कुंभार व्यावसायिकांनी मध्य प्रदेशातून तयार माठ आणि मडकी विक्रीसाठी आणली आहेत. परिणामी त्यांच्या किंमतीही वाढल्या आहेत.कुंभार व्यावसायिकांना माठ, मडकी, चूल, खापर, पणती आणि इतर वस्तू तयार करण्यासाठी खास प्रकारची माती लागते. गेल्या तीन ते चार वर्षापासून अशा प्रकारची माती मिळणे परिसरात दुरापस्त झाले आहे. याशिवाय शासनाची रॉयल्टीदेखील मोठय़ा प्रमाणावर भरावी लागते. त्यामुळे माती परवडणारी नसल्याची स्थिती आहे. परिणामी कुंभार व्यावसायिक मोठय़ा वस्तू अर्थात माठ, मडकी तयार करण्यास सहसा धजावत नाहीत. त्याचा परिणाम कुंभार समाजाच्या व्यावसायावर झाला आहे.परिसरात मातीच नाहीमाठ तयार करण्यासाठी लागणारी चिकट, चिकन आणि विशिष्ट प्रकारची मातीच मिळत नसल्याचे सांगण्यात आले. काही व्यावसायिक लगतच्या गुजरात राज्यातून माती आणत असतात. त्यामुळे तेथील आणि राज्यातील रॉयल्टी भरणे त्यांना परवडत नाही. शिवाय माती देणारे शेतमालकदेखील अव्वाच्या सव्वा भाव मागतात. त्याचा परिणाम सहाजिकच तयार होणा:या वस्तू आणि त्यांच्या किंमतीवर होत असतो. त्यामुळे किंमती वस्तूला सहसा ग्राहक मिळत नाहीत.लहान वस्तू तयार करण्यावर भरयेथील कुंभार व्यावसायिकांनी पारंपरिक लहान वस्तू अर्थात पणत्या, लहान मडके, चूल किंवा इतर वस्तू तयार करण्यावरच भर दिला आहे. स्थानिक ठिकाणी जी माती मिळेल तिचा वापर करून या वस्तू तयार करून आपला पारंपरिक व्यवसाय जिवंत ठेवण्यावर भर दिला जात असल्याचे चित्र आहे. यंदा माठांची आयातगरिबांचा फ्रिज म्हणून ओळख असलेल्या मातीच्या माठाला उन्हाळ्यात मोठी मागणी असते. परंतु यंदा 20 टक्केही माठ स्थानिक ठिकाणी तयार करण्यात आलेले नसल्याचे चित्र आहे. मध्यप्रदेशातून माठांची आयात यंदा स्थानिक व्यावसायिकांनी केली आहे. एक ट्रक साधारणत: 30 ते 35 हजार रुपयांना मिळत आहे. त्यात किमान 170 ते 200 माठ असतात. दोन ते तीन व्यावसायिक मिळून एक ट्रक माल मागवित असतात.यंदा अक्षय्यतृतीयेसाठी लागणारे मडकेदेखील मध्य प्रदेशातूनच आयात करण्यात आले आहेत. केवळ त्यावर ठेवण्यासाठी लागणारे छोटे मडके स्थानिक स्तरावर तयार करण्यात आले आहे. आधीच मातीची कमतरता आणि माठ किंवा मोठे मडके भाजण्यासाठी लागणारी मोठी भट्टी स्थानिक स्तरावर नसल्यामुळे कुंभार व्यावसायिकांनी थेट आयात करणेच पसंत केले आहे. परिणामी त्यांच्या किमतीदेखील वाढल्या आहेत. चिनीमातीचे माठचिनीमातीपासून तयार करण्यात आलेले विविध प्रकार आणि आकारातील माठ यंदा मोठय़ा प्रमाणावर विक्रीस आले आहेत. आकर्षक रंगकाम आणि त्यावरील नक्षीकाम यामुळे असे माठ लक्ष वेधून घेतात. मातीच्या माठातील पाण्याची चव आणि गारवा त्याला येत नसला तरी अशा माठांनाही मोठी मागणी आहे. 100 रुपयांपासून 500 रुपयांर्पयत आकारानुसार त्यांच्या किंमती आहेत. पूर्वी कुंभार व्यावसायिकांना नगरपालिका किंवा ग्रामपंचायत आपल्या हद्दीतील जागेतून माती काढण्याची परवानगी देत असे. आता तसे होत नाही. त्यामुळे मिळेल त्या ठिकाणाहून माती आणावी लागते. सद्य:स्थितीत 1500 रुपयांना एक ट्रॅक्टरभर माती मिळते. परंतु ती आणण्यासाठीदेखील मोठी कसरत करावी लागते. याशिवाय मातीत मिसळण्यासाठी घोडय़ाची लिद आवश्यक असते. परंतु शहर परिसरात घोडेच नसल्यामुळे लिदही मिळत नाही. मोठय़ा भट्टी लावण्यासाठी चारा आणि इतर बाबींची आवश्यकता असते ते आता सर्वच खर्चिक झाले आहे. त्यामुळे हा व्यवसाय परवडेनासा झाला आहे. परिणामी यंदा सर्वच मोठय़ा व्यावसायिकांनी मध्य प्रदेशातील बडवाणी व इतर ठिकाणाहून तयार माठ मागविले आहेत.
माती मिळत नसल्याने व्यवसाय संकटात
By admin | Published: April 24, 2017 11:27 PM