मनोज शेलार, नंदुरबार : व्यापाऱ्याचा विश्वास संपादन करून मुंबईतील तिघांनी ८९ लाखांना फसवणूक केल्याचा प्रकार नंदुरबारात घडला. याप्रकरणी तिघांविरुद्ध नंदुरबार उपनगर पोलिसात २०मे रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांनुसार, नंदुरबारमधील पळाशी शिवारात असलेल्या श्री रामदेवजी ॲग्रो प्रोडक्टसच्या कारखान्याचे मालक शिरीष नारायण अग्रवाल (वय ४५, रा. परशुराम चौक, नंदुरबार) यांच्याकडे २२ मार्च ते २० एप्रिल यादरम्यान वेळोवेळी येऊन भिवंडी येथील जेजे प्रोडक्टसचे रवी किशोरभाई पावून, आशा रवी पावून, सचिन किशोरभाई पावून (सर्व रा.मिरा भाईंदर, मुंबई) यांनी ८९ लाख दोन हजार २३५ रुपये किमतीचा गहू व हरभरा विकत घेतला. त्याची पोहोच देखील केली. परंतु त्याचे पैसे त्यांनी देण्यास टाळाटाळ केली. आपण फसविलो गेल्याचे लक्षात आल्यावर शिरीष अग्रवाल यांनी पोलिसात धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस निरिक्षक दिनेश भदाणे करीत आहेत.