ग्रामपंचायत निवडणूक म्हटली, म्हणजे गावात कुठे फाइट, तर कुठे वातावरण टाइट, अशी स्थिती निर्माण होते. नेत्यांसाठी ग्रामीण भागातील निवडणूक ही सर्वात प्रतिष्ठेची समजली जाते. शहादा तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका निवडणूक आयोगाने घोषित केल्या आहेत, परंतु त्यापैकी सहा ग्रामपंचायती या अगोदरच बिनविरोध झाल्याने २१ ग्रामपंचायतींमध्ये प्रत्यक्ष मतदान होणार आहे.
या निवडणुकीत ६६ प्रभागातून ४४९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सरळ लढतींमध्ये काही ठिकाणी ग्रामविकास पॅनल तर काही ठिकाणी किसान विकास पॅनल अशी वेगवेगळी नावे देऊन प्रचार सुरू आहे. माघारीनंतर प्रत्यक्ष जाहीर प्रचारासाठी केवळ ११ दिवसांचा कालावधी मिळाल्याने, प्रचारादरम्यान उमेदवारांची चांगलीच दमछाक झाली. तालुक्यात काही ठिकाणी दुरंगी व तिरंगी लढतींचा सामना आहे. काही ठिकाणी प्रस्थापितांविरुद्ध नवखे असा सामना रंगला आहे. भावकी-भाऊबंदांमध्ये वाद रंगत असून, एकमेकांची जिरविण्यासाठी सर्व ताकद पणाला लावली जात आहे.
दरम्यान, बहुतांश गावातील नागरिक नोकरी कामधंदा यानिमित्त शहरात वास्तव्यास आहे, परंतु त्यांचे मतदान हे गावातच असल्याने पॅनल प्रमुख संबंधित वार्डातील उमेदवारांना घेऊन शहरात वास्तव्यास असलेल्या मतदारांच्या भेटीगाठी घेऊन मतदानासाठी आवाहन करत आहेत. दरम्यान, जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या राजकारणात ग्रामपंचायतीची सत्ता असणे गरजेचे असते. त्यामुळे या निवडणुकांना अतिशय महत्त्व निर्माण झाले आहे. गावागावातील विविध राजकीय पक्षांचे आणि गटांचे अनेक कार्यकर्ते सध्या तालुका व जिल्हा पातळीवरील विविध संस्थांच्या सत्ता स्थानावर आहेत, तर काही पक्षांच्या नेतेमंडळीकडून अनेक गावांतील प्रमुख कार्यकर्त्यांना तालुका कार्यकारिणीतील पदांवर संधी दिली आहे. त्यामुळे आता ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने या पदाधिकाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. परिणामी, अनेक पक्षांचे पदाधिकारी गावात सत्ता मिळविण्यासाठी गावातच ठाण मांडून आहेत. ग्रामीण भागातील बहुतांश गाव पुढारी हे तालुक्यातील पतसंस्था, संजय गांधी निराधार योजना, पंचायत समिती सहकारी व खासगी प्रकल्पात संचालक म्हणून कार्यरत आहेत. आपल्या पदाचा मान राखण्यासाठी विविध नेतेमंडळी सत्ता काबीज करण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवत आहेत.