नंदुरबार : आदिवासी या देशाचे मूलनिवासी आहेत. या मूलनिवासींच्या भूमीतून अर्थात नंदुरबार येथून लोकसभा निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करण्याचा मानस आहे. यासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची सभा घेण्याचे नियोजन करण्यात येईल, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नंदुरबारमध्ये केले. रविवारी नंदुरबारमध्ये पार पडलेल्या कार्यकर्ता आणि पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी सांगितले की, काँग्रेसच्या सरकारने संविधानावर चालून देश उभा केला आहे. १९५२ च्या निवडणुकीपासून २०१४ पर्यंत नंदुरबारमध्ये काॅंग्रेसचा खासदार निवडून आला आहे. हीच परंपरा पुढे कायम ठेवायची आहे. यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी गांधी घराण्यातील नेत्यांना नंदुरबारमध्ये आणायचे आहे. येत्या डिसेंबरमध्ये आपण पुन्हा नंदुरबारमध्ये येणार आहोत. त्यावेळी तसे नियोजन करणार आहोत.यावेळी प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी नंदुरबार लोकसभा मतदार संघासाठी काॅंग्रेसकडे काही संभाव्य नावे असल्याचेही सूतोवाच केले आहे.बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या कामकाजावर टीका केली. यात त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सुप्रीम कोर्टाने फटकारणे ही महाराष्ट्रासाठी शरमेची बाब असल्याचे सांगितले.
सुप्रीम कोर्टाने मर्यादा देऊन विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी उल्लंघन केले. दर्जेदार आणि चांगल्या संसदीय कामकाजासाठी महाराष्ट्र विधिमंडळ हे देशात ओळखले जाते. यात राहुल नार्वेकर व भाजपकडून असंसदीय पद्धतीने सुरू असलेले कामकाज विधिमंडळाच्या नावावर बट्टा लावणारे आहे. राज्यात सध्या दुष्काळी स्थिती आहे. यातून विमा कंपन्यांनी परतावा देणे आवश्यक होते. परंतु, राज्य शासन विमा कंपन्यांना कोणत्याही प्रकारे आदेश देत नाही. या सर्व विमा कंपन्यांसोबत भाजपचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. देश आणि राज्यात महागाई, बेरोजगारी, महिलांवरचे अत्याचार वाढले आहेत. केंद्राने विशेष अधिवेशन बोलावून महिलांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. परंतु, हे आरक्षण महिलांना प्रत्यक्ष कधी मिळेल, याचा कायदा २०२५ मध्ये होणार असल्याचेही प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी सांगितले.