नवापूर : तालुक्यात १२ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक घेण्यात येत आहे. यादरम्यान गावांमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. ग्रामीण भागातील आदिवासी पाड्यांमध्ये या निवडणुका घेतल्या जात असून, या पाड्यांमध्ये मोठ्या कुटुंबांचा भाव वधारला आहे. एकत्रित कुटुंब पद्धतीसमोर उमेदवार नतमस्तक होताना दिसत आहेत. एकीचे बळ काय असते हे निवडणुकीत कळते.
आदिवासीबहुल भागांमध्ये काका-बाबांचे परिवार मिळून पंधरा ते वीस सदस्य असे एकाच घरात असल्याने प्रभागातील उमेदवारांनी मोठ्या कुटुंबांकडे आपला मोर्चा वळविला आहे. होम टू होम प्रचारासोबतच मोठ्या कुटुंबांतील प्रमुखाला हाताशी घेऊन काही वाॅर्डांतील उमेदवार त्यांना खुश करण्याचा प्रयत्न करीत आहेत. जेणेकरून एकदमच १५ ते २० मते त्यांच्या पारड्यात पाडून घेण्यासाठी ग्रामीण भागातील ग्रामपंचायत निवडणुकीत प्रचाराची जुनी पद्धत सुरू झाली आहे. कुटुंबात मतदारांची संख्या मोठी असल्याने त्यांचा भाव वधारला आहे.
मोठ्या कुटुंबांची गावातील राजकारणामध्ये महत्त्वाची भूमिका असते. सदस्य संख्येच्या बळावर निवडणूक लढतीत त्यांना यशदेखील येते. या कुटुंबांना विधानसभा, लोकसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतदेखील विविध राजकीय पुढाऱ्यांकडून विशेष सन्मान दिला जातो.