लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणूकांचा रंग चढण्यास सुरुवात झाली आहे. परंतू या रंगात निवडणूक अर्जासोबत लागणारी कागदपत्रे मिळवण्यासाठी होणारी धावपळ काहीसा बेरंग करत असल्याचे चित्र आहे. अर्जासोबत लागणारी असंख्य कागदपत्रे मिळवताना इच्छुकांची दमछाक होत असल्याचेही चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यातील ८७ ग्रामपंचायतींच्या एकूण ७६५ सदस्यपदांच्या जागांसाठी निवडणूक कार्यक्रम लागू झाल्यानंतर गावोगावी बैठका आणि चर्चांचे सत्र सुरु आहे. यातून ग्रामपंचायती बिनविरोध करण्यावर भर दिला जात आहे. दरम्यान ८७ ग्रामपंचायतींच्या एकूण २८३ प्रभागासाठी अर्ज दाखल करणेही सुरु झाले आहे. सोमवारी अर्ज दाखल करण्यास गती मिळाल्यानंतर मंगळवारी पुन्हा तहसील कार्यालये गजबजल्याचे दिसून आले होते. परंतू या प्रामुख्याने निवडणूकीसाठी दाखल होणारा अर्ज आणि त्यासाठी लागणारी कागदपत्रे यांचीच चर्चा रंगली होती. अर्ज बाद होणार नाही याची दक्षता करण्यासाठी उमेदवारी सकाळी सहावाजेपासून तालुका तहसील कार्यालयांकडे निघाले होते. नोटरी, बँक खाते यासह हमीपत्रे मिळवण्यासाठी जंगजंग पछाडत असल्याचे दिसून आले. काहींकडून पैसे गेले तरी चालतील पण कागदपत्रे घेऊन या अशा सूचना गावाकडच्या कार्यकर्त्यांना दिल्या जात आहेत. अनेक वर्ष निवडणूकीचा अनुभव असणारेही यंदाच्या १०० टक्के ऑनलाईन प्रोसेसमुळे बुचकाळ्यात पडले असून निवडणूक अर्ज दाखल करण्याची वेबसाईटची वारंवार हँग होत असल्याने त्यांचे जीव टांगणीला लागत आहेत. बुधवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असल्याने कोणत्या गावातून किती अर्ज दाखल होतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे. वेबसाईट हँग होण्याच्या समस्येमुळे अनेक जण रात्री येवून अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.
ही आहेत प्रमाणपत्रे निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्यासोबत विविध प्रकारचे नाहरकत दाखले व स्वयंघोषणापत्र उमेदवाराने देणे बंधनकारक आहे. निवडणूक खर्चासाठी स्वतंत्र बँक खाते अर्जासोबत गरजेचे आहे.
यंदा पहिल्यांदाच सातवी पास असल्याची अट आयोगाने घालण्यात आल्याने तसा दाखला जोडणे आवश्यक आहे.
अर्जासोबत गरजेचे खर्चाचे हमीपत्र, अपत्याबाबतचे घोषणापत्र, महिलांसाठी नावात बदलाचे प्रतिज्ञापत्र ,ग्रामपंचायत ठेकेदार नसल्याचे प्रतिज्ञापत्र, जात वैधता दाखल करण्याचे हमीपत्र, सार्वजिनक, स्वमालकी किंवा भाडोत्री घरात राहत असल्यास शौचालय वापरा चे हमीपत्र सक्तीचे आहे. अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी कागदपत्रे अपडेट नसल्यास ते पुन्हा अपडेटसाठीही धावपळ होत आहे.
नोटरीनंतर होतात अपलोड
विविध प्रकारचे घोषणापत्र जोडल्यानंतर त्यांची नोटरी केल्यानंतर ऑनलाइन पद्धतीने सर्व डॉक्युमेंट निवडणूक आयोगाच्या पंचायत राज या संकेतस्थळावर अपलोड करावयाचे आहे.