महावितरणच्या भरारी पथकाने जून महिन्यात अक्कलकुवा शहरातील सुरेखाबाई शिवाजी पाटील यांच्या घरी छापा टाकून वीजमीटर ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून २४ महिन्यांतील वीजबिलात तफावत दिसून येत होती. यातून कंपनीच्या पथकाने तपासणी केली असता २४ महिन्यांत त्यांनी ५ हजार ८२४ युनिट वीज चोरल्याचे स्पष्ट झाले होते. यातून कंपनीने त्यांना १ लाख २५ हजार २५० रुपयांचा दंड केला होता. परंतु, त्यांनी भरला नाही. यातून सुरेखाबाई पाटील यांच्याविरोधात महावितरण अभियंता बी. आर. मानवटकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अक्कलकुवा पोलीस ठाण्यात वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हवालदार गोविंद जाधव करत आहेत.
दरम्यान, याच दिवशी पथकाने अक्कलकुवा येथील पेट्रोल पंपावर छापा टाकला होता. याठिकाणी अशोक पारस सोलंकी व ज्योती सुनील पावरा यांनी मिळून ३ हजार ६८४ युनिटची वीजचोरी केल्याचे उघडकीस आणले होते. कंपनीकडून त्यांना ९८ हजार ९६० रुपयांचा दंड केला होता. दरम्यान, हा दंडही न भरल्याने अशोक सोलंकी व ज्योती पावरा या दोघांविरोधात महावितरण अभियंता बी. आर. मानवतकर यांनी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार गोविंद जाधव तपास करत आहेत.