लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : लॉडाऊनमध्ये हमी भावाने कापूस खरेदी सुरू करण्याबाबत शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीला शासनाचे आदेश प्राप्त झाले आहेत. सहायक निबंधक यांच्या उपस्थितीत हमी भावाने कापूस खरेदी संबंधित सर्व घटकांची बैठक झाली. हमी भावाने कापूस खरेदी केंद्र लवकरच सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत सहायक निबंधक निरज चौधरी, बाजार समितीचे सभापती सुनील सखाराम पाटील, सचिव संजय चौधरी, सी.सी.आय. केंद्रप्रमुख अरूण भाडाईत, श्रीजी कोटेक्सचे अजय गोयल, राधिका कॉटनचे कैलास पाटील, शैलेश पाटील उपस्थित होते. बैठकीत कापूस खरेदीसंदर्भात सर्व बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सहायक निबंधक व सभापती यांनी कापूस खरेदी त्वरीत सुरू करावी, असे सांगितले. यापूर्वी समितीने भारतीय कॉटन फेडरेशन औरंगाबाद तसेच शहादा केंद्रप्रमुख अरूण भाडाईत यांना हमी भावाने कापूस खरेदी प्रत्यक्षात कधी सुरू करणार याबाबत पत्र दिले असून त्याअनुषंगाने मंगळवारी बैठक पार पडली. याअगोदर शासनाने हमी भावाने खरेदी करण्याचे आदेश दिल्यानंतर बाजार समितीने लगेचच १४ नोव्हेंबर २०१९ ते १४ मार्च २०२० या कालावधीत कापूस खरेदी केंद्र सुरू केले होते. या कालावधीत एक लाख ७८ हजार ६५२ क्विंटल कापूस खरेदी झाली असून त्यापोटी शेतकऱ्यांना ९६ कोटी ८३ लाख ६२ हजार ६२७ रुपये अदा करण्यात आले आहेत. उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक कापूस खरेदी शहादा येथील खरेदी केंद्रावर झाली आहे.शहादा मतदारसंघातील सीमेवर पाहणी करीत असताना मंदाणे येथील शेतकरी बांधवांनी सीसीआयमार्फत कापूस खरेदी चालू करावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीला व सीसीआय यांना विनंती केली असता सकारात्मक बैठक झाली असून लवकरच हमी भावाने कापूस खरेदी केंद्र सुरू केले जाणार आहे.-राजेश पाडवी, आमदार.कापूस खरेदी केव्हापासून सुरू होईल याबाबतचा लेखी खुलासा सीसीआयने समितीस करावा जेणेकरून समितीस कापूस विक्री करणाºया शेतकऱ्यांची नोंदणी करणे व त्यांना टोकन देण्याबाबत पुढील कार्यवाही करता येईल. खरेदीबाबत संबंधितांकडून लेखी प्राप्त झाल्यानंतर नाव नोंदणीबाबत शेतकºयांना कळविण्यात येईल. कापूस खरेदी लवकर सुरू व्हावी याबाबत समिती प्रयत्नशील आहे.-सुनील पाटील, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, शहादा.
शहाद्यात सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 12:46 PM