लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : नंदुरबार जिल्हा परिषदेच्या शहादा तालुक्यातील १४ जागांपैकी सर्वाधिक नऊ जागा भाजपने जिंकल्या आहेत. त्यात लोणखेडा गटातून सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील ह्या पाच हजार ५२६ मतांनी विजयी झाल्याने कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. तालुक्यात सर्वाधिक मतांनी विजयी होण्याचा मान जयश्री पाटील यांनी मिळवला आहे.जि.प. निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपतर्फे एकाही मोठ्या नेत्याने सभा घेतली नाही अथवा प्रचारात सक्रिय सहभाग नोंदविला नाही. सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, जि.प.चे माजी सदस्य जयपालसिंह रावल, राजेंद्रकुमार गावीत यांनी कार्यकर्त्यांच्या सहकार्याने पूर्ण १४ गटात प्रचार यंत्रणा राबवून नऊ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या लोणखेडा गटात अपेक्षेप्रमाणे सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी पाच हजार ५२६ मतांनी विजय मिळवला. तालुक्यात सर्वाधिक मतांनी विजयी होण्याचा मान जयश्री पाटील यांनी मिळविला. हा निकाल जाहीर होताच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दीपक पाटील, नवनिर्वाचित सदस्या जयश्री पाटील व भाजपच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. त्यानंतर लोणखेडा येथे विजयी मिरवणूक काढण्यात आली. डीजेच्या तालावर व ढोल-ताशाच्या गजरात गुलालाची उधळण करीत कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
सर्वाधिक जागा मिळाल्याने आनंदोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 12:43 PM