रमाकांत पाटील । लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 25 : कृषी विभागातर्फे नवापूर तालुक्यातील खांडबारा परिसरात सुरू असलेल्या कामांमध्ये प्रचंड अनागोंदी सुरू असून यासंदर्भात प्रशासनातील एका अधिका:यानेच त्याबाबतची कोंडी फोडल्याने एकच खळबळ उडाली आह़े दरम्यान या संदर्भात चौकशीसाठी स्वतंत्र पथकाची नियुक्ती कृषी अधिक्षकांनी केली आह़ेनवापूर तालुक्यातील खांडबारा-1 या विभागात कृषी विभागातर्फे गेल्या सहा महिन्यात 78 लाखांची कामे करण्यात आली. मजगी, सिमेंट नालाबांध, माती नालाबांध, सलग समतलचर, दगडीबांध, शेततळे आदी कामांचा त्यात समावेश आहे. मात्र या कामांमधील तांत्रिक बाबींची पूर्तता पूर्ण धाब्यावर बसवून करण्यात आली आहे. या परिसरात 30 लाख 39 हजार रुपयांची मजगीची कामे, नऊ लाख 12 हजार रुपयांची सिमेंट नालाबांध, तीन लाख 96 हजार रुपये खर्चाची माती नालाबांध, दोन लाख 59 हजार रुपयांची ओंघळ नियंत्रण, दोन लाख 68 हजार रुपये खर्चाचे सीसीटीची कामे अशी एकूण 44 लाख 39 हजार रुपयांची कामे करण्यात आली आहेत. मात्र नजीकच्या पर्यवेक्षकीय अधिका:याला अनभिज्ञ ठेवून ही कामे परस्पर झाल्याचा आरोप खुद्द पर्यवेक्षक अधिका:यांनी केला आहे. या कामांबाबत दोन टक्के अनामत रक्कम संबंधित ठेकेदाराने 6 जुलै 2017 ला भरल्याचे दाखविले आहे. त्याहून गंमतीची बाब म्हणजे 15 मार्च 2017 रोजीच वरिष्ठ अधिका:यांनी या कामांना मुदतवाढ दिल्याचे आदेश काढले आहेत. वास्तविक कामांना मुदतवाढ देता येत नाही. तरीही या कामांना मुदतवाढ देऊन अटी-शर्तीचा भंग झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. कागदपत्रानुसार अनामत रक्कम जुलै महिन्यात भरल्याने कामे ऐन पावसाळ्यात झाली का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे या कामांची तपासणी जिल्हास्तरीय समितीमार्फत करण्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात अद्यापही तपासणी झालेली नाही. ही कामे अटी-शर्तीचा भंग करून तसेच निकृष्टपणे करण्यात आल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे या भागात तब्बल 78 लाखांची कामे झाली असून त्याचे बिले पर्यवेक्षकाकडून तपासणी न होता काढण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आह़े चौकशी पथक नियुक्त- कृषी अधिक्षक पन्हाळेया संदर्भात कृषी पर्यवेक्षकांनी तक्रारी अर्ज आपल्याकडे दिला असून त्याची दखल घेऊन कामांच्या चौकशीचे आदेश काढले आहेत़ त्यासाठी कृषी अधिकारी वर्ग-2, कृषी पर्यवेक्षक व इतर कर्मचारी असे 6 जणांचे स्वतंत्र चौकशी पथक नियुक्त केले आह़े हे पथक चौकशी करून 15 मे 2018 र्पयत आपला अहवाल सादर करतील़ त्यानंतर जर कोणी दोषी असेल तर त्याबाबत कार्यवाही करण्यात येईल़ अशी माहिती जिल्हा कृषी अधिक्षक कृषी अधिकारी मधुकर पन्हाळे यांनी दिली आह़े खातगाव, ता.नवापूर येथील मजगीच्या व इतर कामांबाबत आपण वरिष्ठांकडे 2 ऑगस्ट 2017 पासून तक्रारी करीत आहोत. यासंदर्भात नियमबाह्य आदेश वरिष्ठांनी काढल्याने त्या कामांची सखोल चौकशी करावी. मंडळ कृषी अधिका:यावर कार्यवाही व्हावी तसेच त्यांच्यावर वरिष्ठांची मेहेरनजर का? याचीही चौकशी व्हावी. यासंदर्भात आपण वरिष्ठ अधिका:यांना लेखी तक्रारी केल्या आहेत. अनुदानाची रक्कम सुमारे एक वर्ष अगोदर काढून नंतर वित्तीय बाबींकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करून संबंधित ठेकेदारांच्या नावे ती जमा करणे, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांना धाब्यावर बसवून अनुदान देण्यास भाग पाडणे असे प्रकार घडत आहेत व त्या कामांवर तपासणी केल्याचे खोटे प्रमाणपत्र देण्याबाबत दबाव टाकला जात आहे.-उमेश भदाणे, कृषी पर्यवेक्षक, खांडबारा-1.
कृषी विभागातील लाखोंच्या कामात अनागोंदी : नवापूर तालुका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 12:43 PM