लोकमत न्युज नेटवर्कनवापूर : नवापूर ते पिंपळनेर रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत. नवापूर ते बोकळझर फाट्यापर्यंतच्या रस्त्यावर खड्ड्यांचे प्रमाण कमी असले तरी नवापूर तालुक्यातील चौकी, रायपूर, वडकळंबी, प्रतापपूर, बोरझर गावा नजीक रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.नवापूर शहरातील नागरिक नाशिक, पुण्याकडे जाण्यासाठी चरणमाळ घाटमार्गे नवापूर ते पिंपळनेर मार्गाने जातात. शॉर्टकट मार्ग असल्याने वेळ व इंधनाची बचत होते. त्यामुळे वाहनचालक या रस्त्याचा वापर करतात. तसेच महाराष्ट्र राज्यातून गुजरात राज्यातदेखील मोठ्या प्रमाणात भाजीपाला व पोल्ट्री व्यवसायातील पक्षी घेऊन जाण्यासाठी वाहनांची मोठी वर्दळ असते. चरणमाळ घाटातील रस्ता खराब झाला असून, मोठमोठे खड्डे पडले आहे. तसेच धोकेदायक वळण, तीव्र उतार, नादुरुस्त कठडे जीवघेणे ठरत आहे. दर महिन्याला तीन ते चार अपघात होऊन अनेक नागरिकांचे बळी जात आहेत. नवापूर ते पिंपळनेर रस्ता व चरणमाळ घाटातील दुरुस्ती करणे गरजेचे आहे. चरणमाळ घाटातील तीव्र उतारावर अवजड वाहने अनियंत्रित होऊन वळणावरील कठड्यावर जाऊन आढळतात. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढेल आहे. घाटातील तीव्र उतार कमी करण्यासाठी घाट कटिंग करून नवापूर ते पिंपळनेर मार्ग सुकर करावा, अशी मागणी होत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष दिसून येत आहे. नवापूर तालुक्यातील रायपूरपासून तर चरणमाळ घाटापर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. ठेकेदार निकृष्ट दर्जाने रस्त्याची दुरुस्ती करतात, अशा ठेकेदारांना नवीन रस्त्याचे काम देऊ नये त्यांना काळ्या यादीत टाकून चांगले ठेकेदाराची निवड करणे गरजेचे आहे. घाटातील कठडेही नादुरूस्त आहेत. तसेच एका मोठ्या वळणावर नेहमी अपघात होत असतात. त्या ठिकाणी कठडे बांधणे गरजेचे आहे. चरणमाळ घाटात रात्रीच्या दरम्यान, चोरीच्याही घटना घडलेल्या आहेत. त्या दृष्टिकोनाने चरणमाळ घाटात नवापूर पोलीस ठाण्यांतर्गत एक पोलीस चौकी निर्माण करणे गरजेचे आहे. तसेच नवापूर पोलिसांनी व वनविभागाने रात्रीच्या वेळी या चरणमाळ घाटात गस्त घालण्याची मागणी केली जात आहे.
चरणमाळ घाट ठरतोय वाहतुकीस धोकेदायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2021 1:41 PM