लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सारंगखेडा, ता.शहादा येथील चेतक महोत्सवाला 3 डिसेंबरपासून सुरुवात होत असून त्याचे उद्घाटन पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते होईल. महिनाभर चालणा:या या महोत्सवात विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रम होणार असून दरम्यानच्या काळात जागतिक दर्जाच्या अश्व संग्रहालयाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती या फेस्टीवल समितीचे अध्यक्ष जयपाल रावल यांनी गुरुवारी दिली.चेतक फेस्टीवल व सारंगखेडा येथील एकमुखी दत्ताच्या यात्रेसंदर्भात माहिती देण्यासाठी जयपाल रावल यांनी गुरुवारी सारंगखेडा येथे पत्रकार परिषद बोलावली होती. त्यात त्यांनी सांगितले, 3 डिसेंबर ते 2 जानेवारी असा महिनाभर चेतक फेस्टीवल चालणार आहे. त्याचे उद्घाटन 3 डिसेंबरला दुपारी तीन वाजता पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते होईल. या वेळी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व प्रमुख अधिकारी उपस्थित राहतील. दत्त मंदिरावर एकमुखी दत्ताच्या पूजेनंतर चेतक महोत्सवाच्या प्रवेशद्वारावरील फित कापून त्याचे उद्घाटन होईल. चेतक महोत्सवाच्या ठिकाणी फोटो गॅलरी, घोडे पाहण्यासाठी व्हीआयपी गॅलरी, यात्रेतील सर्वात चांगले असलेले 25 घोडय़ांचे स्वतंत्र प्रदर्शन, हॉर्स रेसींगची व्यवस्था यासह विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.या फेस्टीवलच्या पूर्वसंध्येला एकमुखी दत्ताची पालखी गावातून काढण्यात येणार आहे. त्यासाठी विविध गावातील भजनी मंडळ व सांस्कृतिक मंडळ सहभागी होणार आहेत. यावर्षी हा पालखी सोहळा भव्य प्रमाणावर होणार आहे. त्यानंतर 3 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान रोज होणा:या कार्यक्रमांची स्वतंत्र पत्रिका तयार करण्यात आली आहे. त्यात विशेषत: सांस्कृतिक कार्यक्रमासह राज्यस्तरीय पोस्टर स्पर्धा, शरीर सौष्ठव प्रतियोगिता, व्हाईस ऑफ सारंगखेडा, प्रसिद्ध पाकतज्ज्ञ विष्णू मनोहर यांच्या उपस्थितीत कुकींग शो व पाककला स्पर्धा, सारंग नृत्य स्पर्धा, मीस सारंगी व मिसेस सारंगी सौंदर्य स्पर्धा, सराश्रवण लावणी कार्यक्रम, अश्वदौड प्रतियोगिता तसेच ‘चला हवा येऊ द्या’ हा टीव्हीवरील हास्य कार्यक्रमाची सारंगखेडावारी, अभय दाते यांचा संगीत रजनी कार्यक्रम असे विविध कार्यक्रम होतील. विशेषत: महिलांच्या कार्यक्रमासाठी येथे महिला कट्टा तयार करण्यात आला आहे. रोज सायंकाळी चार ते सहा वाजेदरम्यान घोडय़ांचे विविध लक्षवेधी कार्यक्रम येथे होतील. त्यात टेन्ट पेगींग, हॉर्स जंप शो, हॉर्स डान्स शो, हॉर्स रेस मोटारसायकल असे कार्यक्रम आहेत. रोज एक ते चारदरम्यान महिला कट्टामध्येही महिलांचे कार्यक्रम होतील.
चेतक महोत्सवाचे पर्यटनमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 12:16 PM