म्हसावद : शहादा तालुक्यातील म्हसावद पोलीस स्टेशनअंतर्गत धडगाव रस्त्यावरील पोलीस चौकीची दुर्दशा झाली असून छताचे पत्रे, दरवाजे, खिडक्या चोरीस गेल्याने म्हसावद पोलिसांचे ‘मदतकेंद्र’ मदतीच्या प्रतिक्षेत आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, म्हसावद पोलीस स्टेशनअंतर्गत धडगाव रस्त्यावर घाटात रात्री-अपरात्री, दिवसा होणारी लूटमार, अपघात, अनपेक्षित घटना घडल्यास मदतीसाठी पोलीस चौकी बांधण्यात आली. म्हसावद पोलीस व धडगाव पोलीस यांच्या हद्दीवर चिचलाबारी पोलीस चौकी आहे. जून 2018 र्पयत चिचलाबारी पोलीस चौकीच्या खिडक्या, दरवाजे, छताचे पत्रे सुस्थितीत होते. मात्र पाच महिन्याच्या कालावधीत चोरटय़ांनी पोलीस चौकीचे दरवाजे, खिडक्या, पत्रे गायब केले. पोलीस चौकीची दुर्दशा सहा महिन्यापासून झाली आहे. चोरांनी पोलीस चौकीवरच ‘डल्ला’ मारल्याने सामान्य जनतेचे काय ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सद्यस्थितीत म्हसावद पोलीस स्टेशनची दुरूस्ती सुरू आहे. बदलून आलेले सहायक पोलीस निरीक्षक मनोहर पगार सर्व दृष्टीकोनातून पोलीस स्टेशनला दुरूस्ती, रंगरंगोटी, कुंपण, वृक्षारोपण यावर भर देत आहेत. याबरोबरच चिचलाबारी पोलीस चौकीचीही दुरुस्ती करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
चिचलाबारी पोलीस चौकीचे पत्रे, दरवाजे, खिडक्या गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 12:32 PM