लोकमत न्यूज नेटवर्कसारंगखेडा : एकमुखी दत्तांच्या यात्रोत्सवात 8 डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा निश्चित झाल्याने प्रशासन कामाला लागले आहे. सलग दुस:या वर्षी मुख्यमंत्री सारंगखेडा यात्रेस भेट देणार आहेत. या वेळी त्यांच्या सोबत अनेक मंत्री, आमदार, खासदारही चेतक महोत्सवात हजेरी लावणार असल्याची माहिती चेतक फेस्टीवलचे अध्यक्ष जयपालसिंह रावल यांनी दिली.महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात ही यात्रा घोडय़ांची यात्रा म्हणून नावारूपाला आली आहे. यात्रेला साडेतीनशे वर्षापेक्षा अधिक कालावधी लाभला असून, या वर्षी महाराष्ट्र पर्यटन विभाग व चेतक फेस्टीवल समितीचे आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्याचे स्वप्नपूर्ण झाले असून, या यात्रेत विदेशी पर्यटकांनीही हजेरी लावून ही यात्रा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याचे काम केले. महाराष्ट्र राज्य पर्यटन विकासमंत्री नंदुरबार जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्रात वाढ करण्यासाठी धडपड करीत आहेत. हे खुद्द् पालकमंत्री जयकुमार रावल यांनी यात्रोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यासप्रसंगी सांगितले.नंदुरबार जिल्हा हा पर्यटनाच हब म्हणून विकसित करण्याचा त्यांचा मानस आहे. या जिल्ह्यात पर्यटनासाठी भरपूर वाव असून, प्रकाशा, तोरणमाळ, सारंगखेडा, रावलापाणी, उनपदेव व काठीच्या होळीतून आदिवासी संस्कृती जगासमोर मांडणार आहे. याबाबत कृती आराखडा तयार केला असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.पर्यटन विभागातर्फे सारंगखेडा चेतक फेस्टीवलसाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, यात विविध कार्यक्रमांची मेजवानी महिनाभर सुरू राहणार आहे. पर्यटन विभागाकडून सारंगखेडा येथे जगात तिसरे व भारतात प्रथम क्रमांकाचे अश्व म्युङिायमचा भूमिपूज सोहळा 8 तारखेला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास पर्यटनमंत्री जयकुमार रावल व त्यांचे सहकारी मंत्री, आमदार, खासदारांसह पर्यटन विभागाचे अधिकारी उपस्थित राहतील.भूमिपूजन स्थळाची पर्यटन विभागातील अधिका:यांसह व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे, सहायक व्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड, प्रादेशिक व्यवस्थापक नितीनकुमार मुंडावरे, कार्यकारी अभियंता हेमंत जगताप, उपअभियंता फारूक शेख, दशरथ मोठाड, सहायक अभियंता महेश बागुल, जयस्वाल आदींनी पाहणी केली.दरम्यान, सारंगखेडा-कळंबू मार्गावर मुख्यमंत्र्यांच्या आगमनासाठी हेलीपॅड तयार करण्याचे काम सुरू असून, बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी हेलीपॅड तयार करण्यात व्यस्त आहेत.
चेतक फेस्टीवलसाठी 8 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री सारंगखेडय़ात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 4:48 PM