विविध शासकीय योजनांच्या लाभाबरोबरच बँक खाते, पॅनकार्ड काढण्यासाठी आधार लिंकिंग व अपडेट करण्याची सक्ती नागरिकांना करण्यात आली आहे. तथापि, ते अपडेट करताना नागरिकांची मोठी दमछाक होत आहे. कारण त्यातील घोळ सुटता सुटत नसून नागरी सुविधा केंद्रांतील कर्मचारीदेखील दाद देत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. कुणाच्या आधारकार्डात जन्मतारीख चुकीची झाली आहे तर कुणाच्या नावात बदल करण्यात आला आहे. या चुकांमुळे नागरिकांच्या कार्डात दुरुस्ती होत नाही. त्यातच सर्व्हर डाऊन व विजेचा लपंडाव यामुळे सेतू केंद्र संचालक नागरिकांना ‘उद्या या, परवा याद असे वायदे देत असतात. त्यामुळे त्यांनाही सतत हेलपाटे मारावे लागतात. विशेषत: ग्रामीण भागात शासनाचे सुविधा केंद्रे नाहीत त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आपल्या गावाहून तळोदा शहरात आधार अपडेटकरीता यावे लागत आहे. मात्र, इकडे काम होत नसल्याने त्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यात त्यांचा वेळ व पैसा वाया जातो तरीही काम होत नाही. अशावेळी मनस्ताप सहन करावा लागतो. आधीच शासनाच्या फीव्यतिरिक्त अधिक चिरीमिरी द्यावी लागते. तरीही काम होत नाही. त्यामुळे आधार अपडेटससाठी शासनाने नागरिकांची होत असलेली फजिती लक्षात घेऊन ठोस मार्ग काढावा, अशी नागरिकांची मागणी आहे. अन्यथा याविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
आधार अपडेटसाठी नागरिक हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 5:22 AM