नंदुरबार : नदीवर फरशीपूल नसल्याने सहा पाड्यातील ग्रामस्थांना ओहवा या गावी येण्यासाठी पुराच्या पाण्यातून वाट काढावी लागत असल्याचे चित्र आहे. यामुळे विद्यार्थ्यांचेदेखील नुकसान होत असून गावातील शाळेत येण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. सातपुड्यातील दुर्गम भागात असलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील ओहवाच्या गोरजाबारीपाडा येथून देहली नदी वाहते. या नदीमुळे गावाच्या अंतर्गत येणाऱ्या सहा पाड्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असते.
त्यात गोरजाबारीपाडासह कौलवीमाळपाडा, खाईपाडा, आधारबारीपाडा, बेझीलपाडा, जागदापाडा, पाडवीपाडा या पाड्यांचा समावेश आहे. या पाड्यांचा दैनंदिन व्यवहार हा ओहवा गावाशी आहे. दळणाची चक्की, शाळा, किराणा दुकान, ग्रामपंचायतींची कामे ओहवा गावात येऊनच करावी लागतात. परंतु पावसाळ्यात नदी दुथडी भरून वाहत असल्याने या पाड्यावरील शेकडो नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. नदीच्या पाण्यातूनच मार्ग काढावा लागतो. शिवाय विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असते. रुग्ण, गरोदर महिला यांना देखील अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे देहली नदीवर पूल बांधावा, अशी मागणी या भागातील ग्रामस्थांनी केली आहे. पावसाळ्यात नदीला पाणी असल्यास जीव धोक्यात घालून जावे लागते. विद्यार्थी, गर्भवती महिला, रुग्ण यांनाही त्रासाला सामोरे जावे लागते. नदीवर पूल झाल्यास सर्वच नागरिकांना सोयीचे होणार आहे. - सुभाष पाडवी, ग्रामस्थ, ओहवाचा गोरजाबारीपाडा.