लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरात डेंग्यूचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या साक्रीनाका परिसरातील रहिवासी वसाहतींना प्रशासनाने ‘डेंग्यू बाधित’ घोषित केले आह़े त्यानुसार या परिसरात विशेष उपाययोजना केल्या जात आह़े शहरात डेंग्यू बाधित असे चार भाग असून त्यात साक्रीनाका परिसराचा समावेश करण्यात आला आह़े नंदुरबार शहरात सर्वात प्रथम साक्रीनाका परिसरातील बागवान गल्ली परिसरात डेंग्यूचे रुग्ण प्रथमच समोर आले होत़े या अनुषंगाने हा परिसर डेंग्यू बाधित घोषित करत त्याचे मॅपिंग करुन आरोग्य विभागाने उपाययोजना केल्याची माहिती आह़े या परिसरात साक्री नाका पाण्याची टाकी, भाट गल्ली, तेली गल्ली, शादुल्ला नगर, आंबेडकर चौक, शाळा क्रमांक 9 मागील परिसर, बागवान गल्ली, फकीरवाडा, गितांजली बिल्डींग परिसर, नवानाथ नगर, टेकडी परिसर, गवळीवाडा, संजयनगर, कुंभारवाडा मेनरोड, चांभार पंच परिसर, गवळीवाडा समाजमंदिर ते थेट शिवाजी रोडर्पयतच्या परिसराचा समावेश करण्यात आला आह़े याठिकाणी डेंग्यूवर नियंत्रण मिळवता यावे यासाठी पालिकेने उपाययोजना केल्या असून 2 ऑक्टोबरपासून नियमित औषध फवारणी आणि फॉगिंग सुरु असल्याची माहिती देण्यात आली आह़े दरम्यान या भागात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी तापाचे रुग्ण समोर येत असल्याने त्यांच्या रक्तनमुन्यांच्या चाचण्या करण्यात येत आह़े डेंग्यूच्या साथीबाबत नियंत्रण व प्रतिबंधाच्या नियोजनासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेत गुरुवारी जिल्हा परिषदेत बैठक घेण्यात आली़ यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी एन. डी. बोडके, जिल्हा हिवताप अधिकारी रविंद्र ढोले, डॉ. राजेश वळवी, यांच्यासह सर्व सहा तालुक्यांचे तालुका आरोग्य अधिकारी, चारही नगरपालिकचे मुख्याधिकारी उपस्थित होते. बैठकीत डेंग्यू नियंत्रणासाठी नागरिकांनी आठवडय़ातून 1 दिवस कोरडा दिवस पाळावा यासाठी आरोग्य पथकांनी घरोघरी जनजागृती करण्याच्या सूचना करुन डेंग्यूचा आतार्पयतचा आढावा घेण्यात आला़
जिल्ह्यात डेंग्यूची चाचणी करण्याचे एकमेव मशिन जिल्हा रुग्णालयात नुकतेच खरेदी करण्यात आले आह़े यातून गेल्या 15 दिवसात आतार्पयत 633 संशयितांचे रक्तनमुने तपासून डेंग्यूचे निदान करण्यात आले होत़े परंतू गेल्या चार दिवसांपासून हे तपासणी कीट संपल्याने अनेकांची गैरसोय झाली़ खाजगी रुग्णालयात डेंग्यूची बाधा झाल्याने उपचार घेणा:या खासदार डॉ़ हीना गावीत यांनीही नाराजी व्यक्त केली होती़ दरम्यान प्रशासनाने मुंबई आणि नाशिक येथून कीट मागवल्याची माहिती देण्यात आली होती़ हे कीट गुरुवारी सायंकाळी प्राप्त झाल्याने शुक्रवारपासून तपासणीचे सत्र सुरळीतपणे सुरु करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाने दिली आह़े
नंदुरबार शहरात डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिकेकडून जिल्ह्यातील इतर पालिकांकडून फॉगिंग मशीन मागवून फवारणी करण्यात आली होती़ यातून फरक न पडल्याने पालिकेने गुरुवारी 75 लीटर क्षमतेचे मोठय़ा आकाराचे फॉगिंग मशीन खरेदी करुन आणले आह़े यामुळे निर्धारित केलेल्या चार डेंग्यू झोनमध्ये एकाच दिवसात धूरफवारणी होणार असल्याचे सांगण्यात आले आह़े नंदुरबार शहर आणि तालुक्यात 300 च्या जवळपास रक्तनमुन्यांचे संकलन आरोग्य विभागाने केले होत़े यातील 216 नमुन्यांची तपासणी पूर्ण झाली होती़ यात 13 जणांना डेंग्यूची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले होत़े नंदुरबार शहरातील डेंग्यूने बाधित असलेल्या दोघांना धुळे येथे पुढील उपचारासाठी आरोग्यविभागाने हलवले आह़े