सुनील सोमवंशी/वसंत मराठे । लोकमत न्यूज नेटवर्कशहादा/तळोदा : सोमवारी झालेल्या विधानसभा निवडणुकीत शहादा- तळोदा मतदार संघात दोन्ही तालुक्यातील मतदानाची टक्केवारी सारखीच असुन या सारख्या मतदानाचा कोणाला किती फायदा होतो हे निकालवरुन दिसून येईल.शहादा- तळोदा विधान सभा मतदार संघात चार उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने चौरंगी लढत झाली. चार उमेदवारांपैकी काँग्रेसचे पद्माकर वळवी, भाजपचे राजेश पाडवी आणि माकपचे जयसिंग वळवी हे तिघेही तळोदा तालुक्यातील आहेत तर अपक्ष उमेदवार जेलसिंग पावरा हे एकमेव उमेदवार शहादा तालुक्यातील आहेत. शहादा- तळोदा मतदार संघात एकुण तीन लाख 20 हजार 403 मतदार असुन पैकी एक लाख 95 हजार 330 मतदार शहादा तालुक्यात आहेत तर एक लाख 25 हजार 79 मतदार तळोदा तालुक्यात आहेत. शहादा तालुक्यातील एक लाख 27 हजार 386 मतदारांनी म्हणजे 65.22 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर तळोदा तालुक्यातील 81 हजार 877 मतदारांनी म्हणजे 65.46 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दोन्ही तालुक्यातील मतदानाची टक्केवारी बघता सारखीच असुन तळोदा तालुक्यात तीन उमेदवार तर शहादा तालुक्यात एकच उमेदवार असल्याने या सारख्या मतदान टक्केवारीचा फायदा कोणाला होईल हे निकालाअंती स्पष्ट होईल. शहादा व तळोदा या दोन्ही तालुक्यात यावेळी ग्रामीण भागात शहराच्या तुलनेने मतदान चांगले झाल्याने याचाही फायदा कोणाला होतो हे पहाणे औत्सुक्याचे ठरेल. शहादा तालुक्यात 98 हजार 973 ग्रामिण मतदारांनी तर फक्त 28 हजार 413 शहरी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तळोदा तालुक्यात देखील 67 हजार 410 ग्रामीण मतदारांनी तर फक्त 14 हजार 467 शहरी मतदारांनी मतदान केले. दोन्ही तालुक्यात शहरी मतदान कमी झाल्याने याचा फटका कोणाला बसतो याकडेही सार्यांचे लक्ष लागून आहे. शहादा नगरपालिका भाजपकडे असूनही आणि विरोधातील काँग्रेसचे नगरसेवकही भाजपावासी झाल्याने शहरातील मतांच्या टक्केवारीत वाढ होणे अपेक्षित असतांना उलट मतांची टक्केवारी घसरल्याने भाजपा उमेदवारास धोक्याची घंटा वाजू शकते. काँग्रेस व अपक्ष उमेदवारांनी शहरापेक्षा ग्रामीण भागात जास्त जोर लावला असल्याने ग्रामीण व शहरी मतांची हि टक्केवारी निकालावर मोठा परिणाम करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
असे झाले मतदान
शहादा मतदारसंघात एकुण तीन लाख 20 हजार 409 मतदार आहेत. त्यात 1,61,663 पुरुष तर 1,58,741 महिला मतदार होते. त्यापैकी 1,07,877 पुरुष तर 1,01,385 महिला मतदार असे एकुण दोन लाख 9 हजार 263 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. त्याची टक्केवारी अर्थातच 65.31 इतकी राहीली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत 70 टक्के मतदान झाले होते.
मतदारसंघात भाजपचा उमेदवार ऐनवेळी बदलण्यात आला. मतदारसंघ हा दोन तालुक्यांचा मिळून झालेला आहे. एकमेव मतदारसंघ दोन नगरपालिका क्षेत्राचा समावेश असलेला आहे. त्यामुळे प्रचार करतांना मोठी कसरत झाल्याचे दिसून आले.
राजेश पाडवी -जमेची बाजू - दीपक पाटील, राजेंद्रकुमार गावीत यांनी भाजपमध्ये केलेला प्रवेश, उमेदवार पाडवी यांचा प्रशासकीय सेवेतील अनुभवाची छाप, भाजपचे सर्व गट-तट मतभेद विसरून प्रचारासाठी एकत्र आले. मुख्यमंत्री व राष्ट्रीय कार्याध्यक्षांची सभा, मुख्यमंत्र्यांकडून उमेदवाराचे कौतूक.उणिवा - नवीन उमेदवार असल्याने सुरुवातीला काहीशी अडचण, कार्याकत्र्याशी ओळखीचा अभाव असल्याने प्रचार नियोजनासाठी कसरत
अॅड.पद्माकर वळवी - जमेची बाजू - तीन वेळा आमदार राहिल्याने व मंत्रीपदीही राहिल्याने या काळात केलेले कामे आणि जोडलेले कार्यकर्ते. प्रचाराचा पुर्वानुभव, जास्तीत जास्त मतदारांर्पयत पोहचण्याचा प्रय}. उणिवा - दिपक पाटील यांच्या रुपाने काँग्रेसचा मोठा गट भाजपमध्ये गेल्याने नुकसान. आघाडीची साथ न मिळाल्याने फटका. पक्षाच्या एकाही मोठय़ा नेत्याची प्रचार सभा न झाल्याने त्याचाही निवडणुकीच्या वातावरण निर्मितीत झालेला परिणाम.
जेलसिंग पावरा - जमेची बाजू - सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता म्हणून या भागात केलेले काम, आदिवासींच्या सांस्कृतिक उपक्रमात घेतलेला सहभाग व त्यासाठी केलेले काम व संघटनात्मक बांधणी, समाजातील मतदारांशी संपर्क.उणिवा- पक्षीय लेबल नसल्याने अपक्ष चिन्ह मतदारांर्पयत पोहचविण्यासाठी कसरत.