लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू करण्यात येत असून त्यासाठी शाळांनी तयारी सुरू केली आहे. ज्या शाळांमध्ये एका वर्गात ४० पेक्षा अधीक विद्यार्थी आहेत अशा शाळांनी एक दिवसाआड संबधीत वर्ग भरविण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या व्हॅाट्सअप गृपवर आवश्यक त्या सुचना देखील देण्यात येत आहेत. दरम्यान, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येत असून त्यासाठी तालुका स्तरावर स्वॅब संकलन करण्यात येत आहे. नववी ते १२ वीचे वर्ग यशस्वीरित्या सुरू झाल्यानंतर आता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील शाळा २७ जानेवारीपासून हे वर्ग सुरू करणार आहेत. तशा आवश्यक सुचना शिक्षण विभागातर्फे शाळांना देण्यात आल्या आहेत. शाळांची होणार कसरतज्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या जास्त आहे अशा शाळांची मात्र मोठी कसरत होणार आहे. शहरी भागातील शाळांमध्येच ही समस्या जास्त प्रमाणात राहणार आहे. शहरी भागात एका वर्गात किमान ५० ते जास्तीत जास्त ७५ विद्यार्थी असतात. अशा वर्गांमध्ये विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने बसविले जाईल, सोशल डिस्टन्सिंगचे पालन होईल का? एका वर्गात किमान ४० ते ४५ विद्यार्थी बसविण्याचे ठरविले तर एका वर्गाचे दोन हॅालमध्ये विभागणी करावी लागणार आहे. अशा वेळी शिक्षकांची मात्र कसरत होणार आहे. एक दिवसाआड वर्गजास्त विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांनी एक दिवसाआड वर्ग भरविण्याचे नियोजन केेले आहे. अर्थात पाचवी, सातवी व नववीचे वर्ग सोमवार, बुधवार, शुक्रवारी भरतील तर सहावी, आठवी व दहावीचे वर्ग मंगळवार, गुरुवार व शनिवारी भरतील अशा प्रकारे एक दिवसाआड वर्ग भरण्याचे नियोजन करण्यात आले आहे. गणवेश, शालेय साहित्य खरेदीपाचवी ते आठवीचे वर्ग सुरू होणार असल्याने आता विद्यार्थ्यांना गणवेश, शालेय साहित्य खरेदी करावी लागणार आहे. त्यासाठी पालकांना सुचना देण्यात आल्या आहेत. शाळांनी सुचना देतांना विद्यार्थ्यांनी शालेय गणवेशातच यावे अशा सुचना दिलेल्या आहेत. त्यामुळे आता पालकांना त्यासाठी खर्च करावा लागणार आहे. याशिवाय शालेय साहित्य देखील खरेदी करावे लागणार आहे. विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या शालेय बस आणि रिक्षा देखील लावाव्या लागणार आहेत.
स्वॅब देण्यासाठी शिक्षकांची होतेय गर्दी...पाचवी ते आठवीला शिकविणाऱ्या सर्व शिक्षकांची कोरोना चाचणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार शिक्षकांची स्वॅब संकलन केंद्रावर गर्दी होत आहे. तीन हजार २२४ शिक्षक व एक हजार ४६५ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करावी लागणार आहे. तसे पत्र त्यांना शाळेकडे द्यावे लागणार आहे.
शहरी भागातील अधीक विद्यार्थीजिल्ह्यातील २८४ माध्यमिक शाळा सुरू होणार आहेत. त्यातील सर्वाधिक शाळा या शहरी भागातील आहेत. ग्रामिण भागात देखील शाळांची संख्या सर्वाधिक आहे. पाचवी ते आठवीचे सुमारे ८० हजार विद्यार्थी आहेत.
पालकांनी पाल्यांना शाळेत पाठवावे...शांळांमध्ये कोरोनाविषयीच्या आवश्यक त्या उपाययोजना राहणार आहेत. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठवावे. त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देऊ नये अशी अपेक्षा शिक्षण विभागातर्फे व्यक्त होत आहे.
पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याचे नियोजन पुर्ण झाले आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या कोरोना चाचण्याही सुरू करण्यात आल्या आहेत. शाळांमध्ये आवश्यक ती सर्व उपाययोजना केली जात आहे. -एम.व्ही.कदम, माध्यमिक शिक्षणाधिकारी.