नंदुरबार : जिल्ह्यातील नंदुरबारसह शहादा व नवापूर बाजार समितींचा निवडणूक निकाल जाहीर झाला असून पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावीत पुरस्कृत पॅनलचा तिनही ठिकाणी दारुण पराभव झाला. तर शहादा बाजार समितीत ४० वर्षानंतर सत्तांतर झाले असून येथे अभिजित पाटील यांच्या पॅनलने बाजी मारली आहे.
नंदुरबार बाजार समिती ही माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या गटाकडे होती. ती त्यांनी कायम राखली आहे. याठिकाणी सर्व १८ जागा जिंकत रघुवंशी गटाने एकतर्फी विजय मिळवला आहे. तर नवापूरलाही काँग्रेसचे आमदार शिरीष नाईक यांनी सत्ता कायम राखली आहे.
ठिकाणी १८ पैकी १४ जागा जिंकत त्यांनी सत्ता काबीज केली आहे. शहादा बाजार समितीत मात्र परिवर्तन घडले आहे. ही बाजार समिती गेल्या ४० वर्षांपासून स्व.पी.के. अण्णा पाटील यांच्या गटाकडे होती. मात्र येथे आता त्यांचे पारंपरिक विरोधक जि.प.चे माजी सभापती अभिजित पाटील यांच्या पॅनलने बाजी मारली आहे. एकूण १८ पैकी १४ जागा त्यांनी जिंकल्या असून दीपक पुरुषोत्तम पाटील गटाला केवळ तीन जागा मिळाल्या आहेत.