संतोष सूर्यवंशी ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वाढते शहरीकरण, पर्यावरणाचा असमतोल या कारणांमुळे पक्ष्यांच्या विविध जाती सध्या लुप्त होत आहेत़ शहरीकरणाचा फटका बसलेली अशाच पक्ष्यांपैकी एक प्रजात म्हणजे चिमणी़ शहरी भागासह ग्रामीण भागातदेखील आता चिमणीचा चिवचिवाट कानावर पडेनासा झालेला आहे़ त्यामुळे ग़दी़ माडगुळकरांच्या रचनेतील या चिमण्यांनो परत फिरा रे... अशी म्हणण्याची वेळ आज आली आहे़यामुळेच नंदुरबार शहरातील अशोक भोई यांनी ‘चिमणी वाचवा’ ही मोहीम हाती घेतली आहे़ त्यांनी सुमारे तिनशेहून अधिक चिमण्यांसाठी घरटी तयार करुन वाटली आहेत़ गेल्या तीन वर्षांपासून ते पुठ्ठ्यापासून चिमण्यांसाठी घरटी करीत आहे़ विशेष म्हणजे ते आपला पारंपरिक व्यवसाय सांभाळून लुप्त होत चाललेल्या चिमण्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत़ अत्यंत साध्या व सोप्या पध्दतीने त्यांनी चिमण्यांसाठी उपयुक्त असे घरटे तयार केले आहे़ अशोक भोई यांनी अतिशय साध्या व सहज उपलब्ध होतील अशा वस्तूंचा वापर करून चिमण्यांसाठी घरटे तयार केले आहे़ यात त्यांनी कडक पुठ्ठा, चिगटपट्टी, प्लॅस्टिक कचकडा, काठी आदी साहित्य वापरले आहेत़ या घराची रचनादेखील मानवी घरासारखीच ठेवण्यात आलेली आहे़ जेणेकरुन ते घरटे एखादी शोभेची वस्तू म्हणूनही भासत आहे़ सुरुवातीला कडक पुठ्ठ्याला घराच्या आकाराने मापशिर कापून घेण्यात येते़ त्यानंतर स्टॅपलर किंवा डिंकाने पुठ्ठ्याचे सर्व भाग मोजमापानुसार जोडून घेतले जात असतात़ त्यानंतर पावसाळ्यातही हे घरटे टिकाव धरू शकेल अशा पध्दतीने त्यावर प्लॅस्टिक कचकड्याचे आवरण लावण्यात येत असते़ त्यामुळे हे घरटे वॉटर प्रुफ होते़ घरटे तयार झाल्यावर चिमणी सहज आत प्रवेश करु शकेल या पध्दतीने खिडकी प्रमाणे पुठ्ठा कापून घेण्यात येत असतो़ चिमण्यांना उभं राहण्यास सोयीस्कर अशा पध्दतीने घराच्या मधोमध लाकडी काडी किंवा तत्सम वस्तू रोवण्यात जाते़ देशात चिमण्यांच्या संख्येची गणना करण्यासाठी शासनाची विश्वसनीय अशी यंत्रणाच नसल्याने अनेक वेळा पक्षीप्रेमींकडून नाराजी व्यक्त करण्यात येत असते़ देशभरात नेचर फॉरेव्हर सोसायटी सारख्या एनजीओ तसेच इतर स्वयंसेवी संस्थांकडून वेळोवेळी पक्ष्यांचे निरीक्षण करण्यात येत असते़ परंतु याला शासकीय प्रोत्साहन मिळत नसल्याचे दिसून येत असते़ चिमणी तसेच कुठलाही पक्षी हा जैव विविधतेचा एक घटक आहे़ या साखळीतील एखादी घटकदेखील वेगळा झाला तरी ही संपूर्ण साखळी कोलमडून पडत असते़ नंदुरबार जिल्ह्याचा विचार करता गेल्या काही वर्षांमध्ये जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालेले आहे़ तसेच विविध ठिकाणी मोबाईल टॉवरदेखील उभारण्यात आले आहे़ याचा सर्वाधिक फटका पक्ष्यांना बसत आहे़
या चिमण्यांनो परत फिरा रे...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 11:37 AM