लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नवीन सरकार येताच जिल्ह्यातील तिर्थक्षेत्र, यात्रास्थळ विकास आणि गावांमध्ये मुलभूत सुविधा पुरविण्याच्या जवळपास ७९ कामांना स्थगिती मिळणार आहे. आधीच्या लोकप्रतिनिधींनी ही कामे सुचविली असल्याने त्यावर आता गडांतर आले आहे.ग्रामविकास व पंचायत राज विभागाने ४ डिसेंबर रोजी तातडीने अध्यादेश काढून सर्व जिल्हा परिषदांना कार्यारंभ देण्यात न आलेल्या विकास कामांना स्थगिती देण्याचे निर्देश दिले होते. त्यात लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामिण भागातील गावांतर्गत मुलभूत सुविधा पुरविणे, यात्रास्थळांच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम, ग्रामिण भागातील तिर्थक्षेत्राच्या विकासाकरीता असलेल्या कामांचा समावेश आहे. या कामांसाठी किमान दोन कोटी तर जास्तीत जास्त २५ कोटी रुपयांचे अनुदान दिले जाते.नंदुरबार जिल्ह्यात अशा प्रकारची एकुण २३० कामे होती. या पैकी १५१ कामांची वर्कआॅर्डर आतापर्यंत काढण्यात आलेली आहे. ही कामे वगळून ७९ कामांना स्थगिती मिळणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यात गावाअंतर्गत मुलभूत सुविधा पुरवणे, तिर्थस्थळ विकास या कामांचा सवांधिक समावेश आहे. शिवाय यात्रास्थळ विकासाची देखील काही कामे असल्याचे जिल्हा परिषद बांधकाम विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले.विभागनिहाय कामांची वर्गवारी करण्याचे काम सायंकाळी उशीरापर्यंत सुरू होते.
नवीन सरकार येताच ७९ कामांना मिळाली स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2019 12:21 PM