लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : मुंबई पोलीस दलात पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले राजेश उदयसिंग पाडवी यांनी शासकीय सेवेत असताना बेकायदा बेनामी संपत्ती मोठय़ा प्रमाणात जमा केली असून, त्यांची लाचलुचपत प्रतिबंध विभागामार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांचे सावत्र बंधू नितीन उदेसिंग पाडवी यांनी राज्याचे पोलीस आयुक्त व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे पोलीस निरीक्षक पाडवी व तक्रारदार नितीन पाडवी हे दोघे सावत्र बंधू असून, ते शहादा मतदार संघाचे आमदार उदेसिंग पाडवी यांचे मुले आहेत.यासंदर्भात दिलेल्या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, राजेश पाडवी दुर्धर आजाराने आजारी असल्याचे खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करून वैद्यकीय रजेवर असताना राजकीय कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासह लोक प्रतिनिधींच्या स्वागताचे, अभिनंदनाचे फलक स्वत:च्या फोटोसह लावून राजकीय कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतात. ते पोलीस निरीक्षक म्हणून मुंबई येथील अंधेरी ईस्ट पोलीस ठाण्यात कार्यरत होते. शासनाने त्यांची आरे कॉलनी पोलीस स्टेशनला बदली केलेली असताना तेथे रुजू न होता वैद्यकीय रजेवर आहेत. आजार पणाची रजा घेवून शहादा-तळोदा विधानसभा मतदार संघातील गावांमध्ये फिरत असून, त्यांनी भारतीय जनतापक्षाकडे उमेदवारी मागीतली आहे आणि मुलाखतही दिली आहे. त्यांचा राजीनामा अथवा व्हीआरएस मंजूर नसतांना ते अशा पद्धतीचे कृत्य करीत असल्याचा आरोप करून त्यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार पुत्रांच्या या वादामुळे परिसरात राजकीय चर्चाना उत आला असून, त्यामुळे खळबळ उडाली आहे.
माङयात आणि वडील आमदार उदेसिंग पाडवी यांच्यात कुठलाही वाद नाही. मात्र माझी वाढती लोकप्रियता पाहून सावत्र बंधूने सुड भावनेने तक्रार केली आहे. माझी संपत्ती वारस हक्काने मिळाली असून, ते आमदार पाडवी यांच्या उमेदवारी अर्जातही 2014 मध्ये नोंद होती. त्यामुळे आरोप निराधार आहेत. -राजेश उदेसिंग पाडवी, पोलीस निरीक्षक, मुंबई