नंदुरबार जिल्ह्यात दररोज शेतकऱ्यांचा शेतातील इलेक्ट्रिक मोटारी, बोअरवेलमधून सबमर्शिबल मोटारी, केबल-वायरी, वीज कंपनीच्या तारा, पाइप, स्टार्टर, मेन स्वीच, लोखंडी व प्लास्टिकचे साहित्य चोरीच्या घटना घडत आहेत. याबाबत त्या त्या पोलीस स्टेशनला गुन्हेही दाखल झाले आहेत. मात्र, चोरट्यांचा तपास लागत नाही. उलट चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. याबाबत नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊनही चोऱ्यांचे प्रमाण कमी झालेले नाही. अत्यंत महागडे साहित्य चोरी होत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. प्रकाशा येथे आठ दिवसांत दोन शेतकऱ्यांच्या मोटारी चोरीला गेल्या. शहादा तालुक्यातील नांदरखेडा, धूरखेडा येथील शेतकऱ्यांच्या मोटारी, केबल, शेतीसाठी लागणाऱ्या साहित्याची आठ दिवसांत मोठ्या प्रमाणात चोरी झाली. या चोऱ्यांचे प्रमाण बघता पोलिसांचा चोरट्यांवर वचक राहिला नसल्याचेच दिसून येते. प्रकाशा येथे वर्षभरापूर्वी इलेक्ट्रिक मोटार दुरुस्तीचे दुकान फोडून १२ मोटारी चोरून नल्या होत्या. या चोरीच्या घटनेतील गुन्हेगारांचा अद्यापही शोध लागलेला नाही.
दरवर्षी शेतकऱ्यांच्या शेतातून मोटारी, केबल, पाइप व इतर साहित्याच्या चोरीसह पिकांचे नुकसान करण्याच्या घटना घडतात. या घटनांमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान करणाऱ्या व शेती साहित्याची चोरी करणाऱ्यांसह हे साहित्य विकत घेणाऱ्यांचा पोलिसांनी त्वरित तपास लावून त्यांना कडक शासन करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी गृहराज्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. शेतकऱ्यांचे चोरीस गेलेले साहित्य आठ दिवसांत परत मिळाले नाही, तर शेतकरी नाइलाजाने बेमुदत उपोषणाला बसतील, असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनाच्या प्रती विशेष पोलीस उपमहानिरीक्षक (नाशिक), जिल्हा पोलीस अधीक्षक (नंदुरबार), उपविभागीय पोलीस अधिकारी (शहादा), पोलीस निरीक्षक (शहादा) यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.
माझ्या शेतातून दोन महिन्यांत दुसऱ्यांदा शेती साहित्याची चोरी झाली. शेतातील इलेक्ट्रिक मोटार चोरट्यांनी चोरून नेली आहे. पाइपही कापून नेले आहेत. शेती साहित्याच्या चोरीच्या घटना जिल्हाभरात वाढल्या आहेत. याबाबतची तक्रार आम्ही गृहराज्यमंत्र्यांकडे केली आहे.
-हरी दत्तू पाटील, चेअरमन, वि.का. सोसायटी, प्रकाशा