लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीच्या निकालावरुन धडगाव तालुक्यात पराडके परिवारविरुद्ध कॉँग्रेस यांच्यात लढत राहिल्याचे दिसून येत आहे. जिल्हा परिषदेच्या सातपैकी चार गटात कॉँग्रेस तर तीन गटात शिवसेनेचे उमेदवार निवडून आले आहे. शिवसेनेच्या तिन्ही विजयी उमेदवारांमध्ये दोन सख्खे भाऊ तर एक काका यांचा समावेश आहे.धडगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सात गट तर पंचायत समितीच्या १४ गणांसाठी निवडणूक घेण्यात आली. मतदानापासून अंदाजाची चर्चा करीत जनता सकाळीच तहसिल कचेरीच्या परिसरात पोहोचले. कचेरी धडगाव शहराबाहेर असल्यामुळे मोकळ्या वातावरणात मतमोजणी झाली. मतमोजणीला उशिरा झाला असला तरी सकाळपासून या परिसरात राजकीय मंडळी व अन्य नागरिकांनी गर्दी केली होती. जिल्हा परिषद निकालात तीन गटात शिवसेना त्यात तोरणमाळ गटात गणेश रुपसिंग पराडके, मांडवी गटात विजय रुपसिंग पराडे यव घाटली गटात रवींद्र पारशी पराडके हे तिन्ही एकाच परिवारातील उमेदवार निवडणून आले आहेत. तर कॉँग्रेसकडून असली, कात्री, रोषमाळ, राजबर्डी या गटांमध्ये कॉँग्रेसचे उमेदवार निवडूक आले आहे. पंचायत समितीत शिवसेना सात जागा, कॉँग्रेस चार भाजपा दोन तर एक अपक्ष असे बलाबल राहिले आहे.
धडगावात पराडके परिवार विरुद्ध कॉँग्रेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2020 2:30 PM