कॉंग्रेस नेते माजी मंत्री पद्माकर वळवी यांचा भाजप प्रवेश, कॉंग्रेसला खिंडार
By मनोज शेलार | Published: March 13, 2024 05:12 PM2024-03-13T17:12:48+5:302024-03-13T17:14:00+5:30
जिल्ह्यातील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री ॲड.पद्माकर वळवी यांनी अखेर कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला.
मनोज शेलार,नंदुरबार : जिल्ह्यातील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री ॲड.पद्माकर वळवी यांनी अखेर कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. खासदार राहुल गांधी यांची भारत न्याय जोडो यात्रा जिल्ह्यातून निघताच मोठ्या नेत्याने कॉंग्रेस सोडल्याने राजकीय वर्तूळात चर्चा सुरू आहे.
दरम्यान, मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ॲड.वळवी यांचे पक्षात स्वागत केले.तळोदा-शहादा मतदारसंघाचे माजी आमदार, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री ॲड.पद्माकर वळवी यांच्या कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देण्याची चर्चा गेल्या महिनाभरापासून सुरू होती. ते भाजपात जाणार अशीही चर्चा होती.
अखेर बुधवार, १३ रोजी मुहूर्त निश्चित झाला. १२ रोजी कॉंग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा नंदुरबारातून निघताच ॲड.वळवी हे देखील आपल्या समर्थकांसह मुंबईला रवाना झाले. बुधवारी सकाळी मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ॲड.पद्माकर वळवी यांना पक्षाचा स्कार्प घालून त्यांचा पक्ष प्रवेश केला. यावेळी खासदार अशोक चव्हाण, मंत्री गिरिश महाजन, डॉ.विजयकुमार गावित, प्रदेश महामंत्री विजय चौधरी आदी नेते उपस्थित होते.