रमाकांत पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, नंदुरबार : भगवान राम आणि शबरीचे पुजारी म्हणवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात देशातील महिला आणि सामान्य जनतेवर सर्वाधिक अन्याय झाले असून, त्यावर देशातील भाजप सरकारने कुठलीही भूमिका न घेता चूप बसून होते. त्यामुळे केवळ लोकांच्या मतांसाठी जनतेची दिशाभूल करण्याचे काम हे सरकार करीत आहे. म्हणून या सरकारला आता खाली खेचून देशातील गरीब, आदिवासी, दलित, शोषितांची भाषा समजणाऱ्या काँग्रेसला साथ द्या, असे आवाहन काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी शनिवारी केले.
नंदुरबार येथे झालेल्या सभेच्या व्यासपीठावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, माजी मंत्री आमदार ॲड. के.सी. पाडवी, आमदार शिरीष नाईक, नसीम खान यांच्यासह मविआचे पदाधिकारी उपस्थित होते.
‘ते’ गरिबांचे नव्हे, तर उद्योगपतींचे उद्धारकर्ते
पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:ला गरिबांचे उद्धारकर्ते मानतात मात्र प्रत्यक्षात हे गरिबांचे नव्हे तर अरबपती, खरबपती, उद्योगपतींचे उद्धारकर्ते आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना देशातील सर्वोच्च पद दिल्याचे अभिमानाने सांगतात. मात्र, त्याच आदिवासी राष्ट्रपतींना नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाला आणि राम मंदिराच्या उद्घाटनालाही बोलावले जात नाही. जनतेसमोर येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकांचे प्रश्न सोडविण्याऐवजी स्वत:चेच प्रश्न मांडून अश्रू गाळतात, अशी टीका प्रियांका गांधी यांनी केली.
जनतेचे प्रश्न ‘त्यांना’ काय कळणार?
पंतप्रधान झाल्यानंतर आजवर ते कधी गरीब, आदिवासींच्या घरात जाऊन त्यांचे प्रश्न समजून घेतले नाही. त्यांना या देशातील गरिबांचे, शेतकऱ्यांचे, आदिवासींचे प्रश्न काय आहेत, ते काय कळणार? या देशाला इंदिरा गांधी, राजीव गांधी, मनमोहन सिंग, अटलबिहारी वाजपेयी अशा दिग्गज पंतप्रधानांची परंपरा लाभली असताना नरेंद्र मोदी यांनी या पदाची गरीमा घालविली, असा आरोपही प्रियांका यांनी केला. त्यांचेच जवळचे नेते जेव्हा सार्वजनिक सभांमध्ये संविधान बदलण्याची भाषा करतात त्यावेळी हे केवळ बघ्याची भूमिका घेतात, असेही त्या म्हणाल्या. ५२ मिनिटांच्या भाषणात प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चांगलाच समाचार घेतला. आमदारांना खरेदी करून दबावतंत्राने पक्षांची तोडफोड करून सत्ता बळकावण्याचे कारस्थान काँग्रेस कधीही करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.