लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : वादग्रस्त विषयांवरून तहकूब झालेली येथील नगर पालिकेची सर्वसाधारण सभा तब्बल दोन महिन्यांनतर बुधवारी व्हीडीओ कॉन्फरन्सने घेण्यात आली. बायोडिझेल पंपास नाहरकत दाखला देणे व खान्देशी गल्लीच्या टोकाजवळील स्वच्छता गृह हलविणे हे दोन्ही विषय नामंजूर करण्यात आले. सत्ताधारी भाजपाने स्पष्ट विरोध तर विरोधी काँग्रेस तटस्थ राहिली. या सभेबाबत तळोदा शहरवासीयांनाही उत्सुकता लागली होती.तळोदा नगरपालिकेची सभा बुधवारी नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली व्हीडीओ कॉन्फरन्सने पालिकेच्या सभागृहात घेण्यात आली होती. सभेच्या अजेंड्यावर एकूण ५४ विषय घेण्यात आले होते. यात सीतारामनगरमधील आदिवासी सांस्कृतिक भवनाच्या बांधकामास मुदत वाढ देणे, पालिका हद्दीतील मोकळ्या जागांवर वर्गाचे बगीचे विकसीत कणे, विविध रस्ते, गटारीांं प्रशासकीय मंजुरी देणे, व्यापारी गाळ्यांचे भाडे निश्चित करणे, रस्ता व चौकाच्या मध्यभागी विविध प्रकारची शिल्पे बसविण्याकामी प्रशासकीय मंजुरी देणे, पालिका हद्दीतील पथदिवे, देखभाल दुरूस्ती करणे, नव्याने बांधण्यात आलेल्या सभागृाचे इलेक्ट्रीक फिटींग करणे, आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रमाचे अंदाज पत्रके तयार करणे, आरोग्य विभागात फवारणी यंत्रे खरेदी करणे, बांधकामांना मुदत वाढ देणे, पालिकेच्या नवीन इमारतीचा परिसर विकसीत करणे, पालिका हद्दीतील अतिक्रमणे काढणे, अशा वेगवेगळ्या विषयांबरोबरच शहातील हातोडा रस्त्यावरील बायोडिझेल पंपासाठी ना हरकरत दाखले देणे, नवीन बियर बारला परवानगी देणे, खान्देशी गल्लीच्या टोकावरील स्वच्छता गृह इतरत्र हलविणे, नवीन प्रशासकीय इमारती जवळ कुपनलिका करणे, बगीच्यात विद्युत रोषणाई करणे आदी कामांचा समावेश होता. यातील पंपास नाहरकत दाखला व स्वच्छता गृह हलविण्याचा ठराव वगळता इतर सर्व ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले.डिझेल पंपाच्या ठरावास सत्ताधारी भाजपातील नगरसेवकांनी विरोध केला तर विरोधी काँग्रेसच्या नगर सेवकांनी तटस्थेची भूमिका घेतली होती. स्वच्छतागृहांचा विषय पालिका प्रशासनावर सोपविण्यात आला. या तीन विषयांवरून दोन महिन्यांपूर्वी पालिकेची सभा तहकूब करण्यात आली होती. त्यातही प्रमुख विषय डिझेल पंपाचा होता. तो आता नामंजूर करण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. त्यामुळेच सत्ताधारी भाजपात दोन गट पडले होते. आता सत्ताधारी सर्वांनी त्यास विरोध केल्यामुळे भाजपा नगरसेवकांमध्ये ऐकी दिसून आली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रथमच पालिकेत व्हीडीओ कॉन्फरन्सींगने सभा घेण्यात आली. या सभेस उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौरी, विरोधी पक्षनेते संजय माळी, गटनेते गौरव वाणी, नगरसेविका अंबिका राणे, सयना परदेशी, सुरेश पाडवी, बेबीबाई पाडवी, योगेश पाडवी, सुभाष चौधरी, जितेंद्र सूर्यवंशी, भास्कर मराठे, अनिता परदेशी, हितेंद्र क्षत्रिय, हेमलाल मगरे, शोभाबाई भोई, अनिता पाडवी, कल्पना सतिवान पाडवी, रामानंद ठाकरे, अमानोद्दीन शेख आदी सर्व नगरसेवक सहभागी झाले होते.सभेचे प्रास्ताविक मुख्याधिकारी सपना वसावे यांनी केले होते. सभेसाठी कार्यालयीन अधीक्षक राजेश पाडवी, नितीन शिरसाठ, अश्विन परदेशी, दिगंबर माळी, विशाल माळी, संगणक अभियंता सचिन पाटील यांनी परिश्रम घेतले.
कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने व्हीडीओ कॉन्फरन्सींने सर्व साधारण सभा घेण्याचे निर्देश पालिकेला दिले होते. त्यासाठी एक दिवस आधी नगरसेवकांना सभा कशी हाताळावी, त्याचे प्रशिक्षण दिले होते. गुगल मीटअॅप इन्स्टॉल करून दोन वेळ त्यांना डेमो देण्यात आला होता. शिवाय कुठे बोलणे थांबवावे, तरीही एका वेळी अनेक जण बोलत होते. त्यामुळे थोडा गोंधळदेखील निर्माण झाला होता. शेवटी दोन विषयांव्यतिरिक्त विषय पालिकेतील सर्व विषयांना अर्ध्या तासात मंजुरी देण्यात आली. तथापि जिल्हा प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमिवर नंदुरबार, शहादा, नवापूरसह तळोद्यातही आठ दिवस लॉकडाऊन केले आहे. शहरात कोरोनाचे प्रमाण नगन्य आहे. त्यामुळे या लॉकडाऊनच्या कालावधीतून तळोदा शहराला वगळण्यात यावे, अशी सूचना काँग्रेसचे नगरसेवक संजय माळी यांनी मांडली होती. त्याबाबत नोंद घेण्यात आल्याचे मुख्याधिकारी सपना वसावे यांनी सांगितले. दरम्यान शहरातील व्यापाऱ्यांनीदेखील याबाबत नगराध्यक्ष अजय परदेशी यांची भेट घेतली होती. तेव्हा त्यांनी जिल्हा प्रशासनाशी संवाद साधला होता. मात्र लॉकडाऊन बाबत कुठलीही तडजोड करता येणे अशक्य असल्याचे प्रशासनाने सांगितल्याचे म्हटले जात आहे.