लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा रुग्णालयात टोसीलाझुमाब व रेमडीसीव्हर इंजेक्शन उपलब्ध नसल्याने कोरोना रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढले आहे. जिल्हा रुग्णालयात रुग्णांची कुठलीही काळजी घेतली जात नाही. या सर्व बाबींची चौकशी करावी अशी मागणी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.जिल्ह्यात कोरोनाबाधीतांच्या मृत्यूंची संख्या वाढत आहे. कोविड कक्षातील अनागोंदी आणि असुविधांबाबत तक्रारी होत आहेत. कोरोनाचा उद्रेक वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या बाबींची दखल घेऊन माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहून याकडे लक्ष वेधले आहे. पत्रात म्हटले आहे की, नंदुरबार हा आदिवासी जिल्हा असून गुजरात व मध्यप्रदेशच्या सिमेवर आहे. दोन्ही राज्यातून मोठ्या प्रमाणावर नागरिकांची, माल वाहतुकीची ये-जा सुरू असते. सद्य स्थितीत नंदुरबार जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्ह्याचा मृत्यूदर देखील वाढला आहे. कोरोनामुळे होणारे मृत्यू ही चिंतेची बाब ठरली आहे.जिल्हा रुग्णालयात इंजेक्शन उपलब्ध नाहीत. रुग्ण गंभीर झाल्यावर इंजेक्शन उपलब्ध नसल्याने त्याला जीव गमवावा लागत आहे. जिल्हा रुग्णालयाला शासनाकडून कोविड-१९ साठी लागणारे टोसीलाझुमाब व रेमडीसीव्हर हे इंजेक्शन का दिले जात नाही? या बाबीची वरिष्ठ पातळीवरून चौकशी होणे गरजेचे आहे. इंजेक्शन अभावी आणखी किती जणांचे बळी जाऊ देण्याची वाट पहाणार आहात? असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे.जिल्हा रुग्णालयातील कोविड कक्षात रुग्णांची काळजी घेतली जात नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. डॉक्टर मंडळी देखील दुर्लक्ष करीत आहेत. रुग्ण व नातेवाईकांच्या या तक्रारी वाढत आहेत.या सर्व बाबींची आपल्या स्तरावर दखल घेऊन चौकशी करावी, आरोग्य सेवा व आवश्यक इंजेक्शन, औषधी तातडीने उपलब्ध करावी अशी मागणीही माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आपल्या पत्रात केली आहे.राजकीय नेता व लोकप्रतिनिधीकडून प्रथमच अशा प्रकारची तक्रार केली गेल्याने त्याकडे गांभिर्याने पाहिले जात आहे. आरोग्य मंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांनाही याबाबत कळविण्यात आले आहे. त्यामुळे कार्यवाहीकडे आता लक्ष लागून आहे.
इंजेक्शनअभावीच जिल्ह्यात कोरोनाबाधींतांच्या मृत्यूचे सत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 12:35 PM