लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्यातील विविध भागांत गुरुवारी सकाळी तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या. पहाटे पाच वाजेच्या सुमारास कोसळलेल्या सरींनंतर उघड्यावर ठेवलेला शेतमाल, कापूस तसेच मिरच्या झाकण्यासाठी शेतक-यांची एकच धावपळ उडाली.हवामान खात्याने नंदुरबार जिल्ह्यात १० ते १२ डिसेंबर या तीन दिवसांच्या काळात वादळी वाऱ्यासह पाऊस येण्याची शक्यता वर्तविली होती. यातून नंदुरबार बाजार समितीने कापूस व मिरची खरेदी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, पहाटे ५ वाजेच्या सुमारास नंदुरबार तालुक्यातील लहान शहादे, कोळदे, भागसरी, खोंडामळी यांसह विविध गावांमध्ये पहाटेच्या सुमारास पावसाच्या सरी कोसळल्या. यानंतर तालुक्यातील विविध भागांत दिवसभर ढगाळ वातावरण होते. जिल्ह्यातील इतर भागांत पाऊस झालेला नसल्याची माहिती देण्यात येत असून, काही भागात ढगाळ वातावरण असल्याचे सांगण्यात आले आहे. रब्बीच्या प्रारंभीच निर्माण झालेले ढगाळ वातावरण आणि तुरळक पाऊस यातून वेचणी न झालेला कापूस, जमिनीवर आलेला गहू, हरभरा आणि तोडणी न झालेली मिरची यांना फटका बसण्याची शक्यता आहे. ११ आणि १२ या दोन दिवसांत वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळल्यास शेतकऱ्यांच्या अडचणी वाढणार आहेत. पावसाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीकडून पळाशी येथील कापूस खरेदी केंद्रावरचे व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने गुरुवारी सकाळी कापूस घेऊन आलेले शेतकरी वाहने घेऊन मोजणी केल्याविनाच परत गेल्याचे सांगण्यात आले आहे. दुसरीकडे मिरची खरेदी-विक्रीचे व्यवहारही बंद ठेवण्यात आल्याने शेतकरी व व्यापारी यांचे नुकसान झाले आहे. बाजार समितीत आलेली काही वाहने शेतमाल परत घेवून गेल्याचे सांगण्यात आले आहे. पावसामुळे शहरातील विविध भागांतील मिरची पथारींवर सुकवलेली मिरची सुरक्षितस्थळी हलविण्याची मजुरांची धावपळ सुरू होती. दिवसभरातील ढगाळ वातावरणामुळे व्यापाऱ्यांनी खरेदी केलेली मिरची पोत्यांमध्ये भरून सुरक्षितस्थळी रवाना केल्याची माहिती देण्यात आली आहे. ढगाळ वातावरण कायम राहिल्यास किरकोळ आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे.
ढगाळ वातावरणामुळे कापूस खरेदी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 1:01 PM