नंदुरबार : यंदाच्या हंगामातील कापूस खरेदीला नंदुरबार बाजार समितीतर्फे सोमवारपासून सुरुवात होणार आहे. या ठिकाणी काही खाजगी व्यापारी कापूस खरेदी करीत असतात. दरम्यान, याच आवारात सीसीआयचे देखील कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात येते. यंदा सीसीआय दिवाळीनंतरच कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची शक्यता आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्व. राजीव गांधी कापूस खरेदी केंद्र, पळाशी येथे सोमवार पासून कापूस खरेदीच्या शुभारंभ शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
परवानाधारक खरेदीदार यांच्यामार्फत १६ ऑक्टोंबर रोजी सकाळी १० वाजता बाजार भावाने कापूस खरेदी व्यवहार सुरू होणार आहे. शेतकरी बांधवांनी कापूस स्वच्छ व कोरडा करून विक्रीस आणावा असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रमसिंह वळवी, उपसभापती वर्षा पाटील, सचिव योगेश अमृतकर यांनी केले आहे. दिवाळीपूर्वीच कापूस खरेदी केंद्र सुरू होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. दरम्यान, सीसीआयचे केंद्र सुरू झाल्यानंतरच या ठिकाणी कापूस भावाबाबत चढाओढ राहणार आहे. त्यामुळे सीसीआयचेही खरेदी केंद्र लवकर सुरू करावे अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून केली जात आहे