तळोदासह धडगाव तालुक्यातील जनतेला मुख्यालयी जोडण्यासाठी राज्य शासनातर्फे तापी नदीवर हातोडा पूल बांधण्यात आला आहे. परंतु या पुलाच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाबाबत सातत्याने प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे. कारण गेल्या दीड वर्षापूर्वी देखील उजव्या बाजूस मोठे भागदाड पडले होते. त्यावेळी वाहनचालकांची मोठी ओरड झाल्यानंतर ते भराव टाकून बुजविण्यात आले होते. आताही बुधवारी पुलाच्या डाव्या बाजूडील पुलाच्या मधल्या भागातील मोठा भराव खचला आहे. दोन दिवस होऊनही संबंधित बांधकाम यंत्रणेने तो बुजविण्याची तसदी घेतलेली नाही. वास्तविक येथे दुचाकी, लहान चारचाकी, मोठी वाहनांची प्रचंड वाहतूक सुरू असते. येथून वाहन काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे हा खड्डा मोठा जीवघेणा ठरत आहे. या पुलावर शासनाने कोट्यवधी रुपयांचा खर्च केला आहे. तरीही त्याच्या अशा निकृष्ट कामामुळे जनतेमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. बांधकाम विभागाच्या वरिष्ठ यंत्रणेने चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
पुलावर लायटिंग व्यवस्था करावी
तळोदा व नंदुरबारकडील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या पुलावर वाहनांची मोठी संख्या आहे. साहजिकच रात्रीबेरात्री वाहन धारक ये-जा करीत असतात. साहजिकच येथून अंधारामुळे वाहनधारकांना जीव धोक्यात घालून मार्गक्रमण करावे लागत असते. अशावेळी अप्रिय घटना घडण्याची शक्यतादेखील नाकारता येणार नाही. परंतु पुलावर लाईटची व्यवस्था करायला बांधकाम विभाग तयार नाही. संबंधित यंत्रणा दुर्घटना घडण्याची वाट पाहत आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे.