नंदुरबार : अक्कलकुवा शहरातील इंडियन ऑइल पेट्रोलपंपाच्या बाजूला असलेल्या टायरच्या शोरुममध्ये तब्बल ७७ महिने वीजचाेरी होत असल्याचा प्रकार महावितरणच्या भरारी पथकाने उघडकीस आणला होता. याप्रकरणी व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. डिसेंबर २०२२ मध्ये महावितरणच्या भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता बकुळ रामदास मानवतकर यांनी अक्कलकुवा शहरातील पेट्रोलपंपालगत असलेल्या टायरच्या शोरुममध्ये छापा टाकला होता. याठिकाणी त्यांना वीजचोरी होत असल्याचे निदर्शनास आले होते.
दरम्यान, त्यांनी वीज मीटर जप्त करून चाैकशी केली होती. चाैकशीअंती व्यावसायिक जयेश राजेंद्र मुथा (४५) याने ७७ महिन्यांत दहा हजार ४० युनिट विजेची चोरी केल्याचे समोर आले होते. यातून महावितरणने तडजोडीअंती दाेन लाख १५ हजार ४१० रुपयांचे वीजबिल भरण्याचे सूचित केले होते; परंतु, संबंधिताने बिल न भरता दुर्लक्ष केले होते. यातून गुरुवारी अतिरिक्त कार्यकारी अभियंता बकुळ मानवतकर यांनी अक्कलकुवा शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून जयेश राजेंद्र मुथा (४५) याच्याविरोधात वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस नाईक कपिल बाेरसे करीत आहेत.