नंदुरबार : जिल्हा पोलिस दलातर्फे राज्यात प्रथमच ‘गुन्हेमुक्त गाव’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात १४ गावांमध्ये हा उपक्रम सुरू होत आहे. त्याची सुरुवात गडद, ता. नवापूर या गावापासून नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी.जी. शेखर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरू करण्यात आली आहे.
यात केवळ गुन्हे घडू नये हाच उद्देश नसून कायद्याची जनजागृती, अमली पदार्थ मुक्त, वृक्षारोपण, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन यासह कम्युनिटी आणि सोशल पोलिसिंग यांचा समावेश राहणार आहे. पोलिस अधीक्षक पी.आर. पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू झालेेल्या ‘गुन्हेमुक्त गाव’ या योजनेचे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करून सुरुवात करण्यात आली. गुन्हेमुक्त गाव मोहिमेंतर्गत पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १४ गावांची निवड करण्यात आली आहे.
बी.जी. शेखर पाटील यांनी सांगितले, भारत हा खेड्यांचा देश आहे आणि खेड्यांचा विकास झाला तर देशाचा विकास होत असतो. गदड गाव हे नावाप्रमाणेच वृक्षांनी गडद आहे. त्यात अधिक प्रयत्न करून जास्तीत जास्त वृक्षारोपण करावे. गुन्हेमुक्त गाव मोहिमेंतर्गत गडद गावात जिल्हा पोलिस दलामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.