शहादा तालुक्यात मंगळवारी रात्री मेघगर्जनेसह जोरदार अतिवृष्टी झाल्याने सर्वत्र हाहाकार उडाला. त्यात प्रथमच नदी-नाल्यांना पाणी आले. यंदाच्या खरीप हंगामात पिकांची परिस्थिती नाजूक असतानाच सप्टेंबर महिन्यात आलेल्या जोरदार पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यात तालुक्यातील बहुतांश भागात पपई, ऊस, सोयाबीन, मिरची आदी पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी पुरता कोलमडला आहे. मुसळधार पावसाने पिकांना चांगलेच झोडपल्याने पिके जमिनीवर आडवी झाली आहेत.
गेल्या वर्षी कोरोनामुळे उत्पादित मालाला भाव नव्हता; परंतु उधार-उसनवार, कर्ज काढून कसेबसे शेतकऱ्यांनी यंदा खरिपाची पेरणी केली. त्यातच पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम येतो की नाही, अशी चिंता सतावत होती. मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने पिकांना आडवे केले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. याबाबत पंचनाम्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत होती. त्यानुसार कृषी व महसूल विभागाचे पथक नुकसानग्रस्त भागात भेट देऊन पाहणी करून पंचनामे करीत आहेत.