ब्राह्मणपुरी : भाविकांचे श्रद्धास्थान असलेले कोचरा माता मंदिरात गुरुवारी सकाळी पुजारी व ग्रामस्थांनी कोचरा माता मंदिर परिसर साफसफाई करीत असताना अचानक ग्रामदैवत माउल्यांचे डोळे उघडल्याची वार्ता सोशल मीडियावर पसरली.. अन् भाविकांची दर्शनासाठी गर्दी उसळल्याने पोलिसांनी तात्काळ कोचरा माता मंदिर येथे धाव घेत अफवा असल्याची माहिती देत चोख बंदोबस्त लावण्यात आला होता.
शहादा तालुक्यातील कोचरा येथे प्राचीन कोचरा मातेचे मंदिर आहे. नवसाला पावणारे देवस्थान म्हणून श्रद्धा असल्याने येथे गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश येथून भाविक येतात. येथे मंगळवारी व शुक्रवारी भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते. मंगळवारी व शुक्रवारी कोचरा माता मंदिरावर महिलांकडून दही, भात, गुळाचा नैवेद्य दाखवण्यासाठी महिलांची गर्दी होते. गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे मंदिरे बंद आहेत. त्यामुळे भाविक कोचरा मंदिर परिसरात येऊन बाहेरून दर्शन घेतात. परंतु आषाढ महिना सुरू झाल्याने गुरुवारी सकाळी स्थानिक ग्रामस्थ पुजाऱ्यांमार्फत मंदिर परिसर व माऊली यांची साफसफाई करण्याचे काम सुरू होते. साफसफाई करीत असताना अचानक माउल्यांचे डोळे उघडे झाल्याची वार्ता रात्री उशिरापर्यंत परिसरातील गावांमध्ये सोशल मीडियाद्वारे पसरताच भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
कोरोनाकाळात कोचरा माता मंदिर परिसरात गर्दी होत असल्याची माहिती म्हसावद पोलिसांना मिळताच तात्काळ कोचरा माता मंदिर येथे दाखल होत गर्दी न करण्याचे आवाहन म्हसावद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृती पवार यांनी केले. तसेच याठिकाणी पोलीस पथक तैनात करण्यात आले असून, कोचरा माता फाट्यावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
भाविकांचा हिरमोड
कोचरा माता मंदिरावर आषाढ महिन्याचा शुक्रवार असल्याने नैवेद्य देण्यासाठी महाराष्ट्र राज्यासह गुजरात, मध्य प्रदेश राज्यातील भाविक दाखल होत होते. परंतु कोचरा माता मंदिरावर कोरोनाच्या अनुषंगाने बंदी असल्याने भाविकांना कोचरा माता फाट्यावरच नैवेद्य देऊन परतीला जावे लागत असल्याने भाविकांचा हिरमोड झाला.