लोकमत न्यूज नेटवर्कमंदाणे : शहादा तालुक्यातील मंदाणे येथील अष्टभूजादेवी भवानी मातेच्या यात्रोत्सवाच्या पाचव्या दिवशी रविवार आल्याने यात्रेकरूंची गर्दी उसळली होती. मातेच्या दर्शनाबरोबरच यात्रेकरूंनी खरेदीवरही भर दिल्याने लाखो रुपयांची उलाढाल झाली.मंदाणे येथील यात्रा सुमारे 15 ते 20 दिवस भरते. यात्रेच्या प्रारंभी दोन-तीन दिस मंदीचे सावट असते. मात्र साधारणपणे चौथ्या दिवसापासून खरेदी करण्यावर यात्रेकरूंचा जास्त भर राहत असतो. शनिवारी व रविवारच्या दिवशी भाविकांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली.या यात्रोत्सवाचे वैशिष्टय़ म्हणजे मंदाणे भागातील सर्वात मोठी यात्रा असते. मध्यप्रदेशच्या सिमेलगत हा परिसर असून, आदिवासी लोकवस्तीची गावे अधिक आहेत. या परिसरातील सर्व गावातील नागरिक कुटुंबासह यात्रेत हजेरी लावतात. विवाह सोहळ्याचा हा काळ राहत असल्याने संसारोपयोगी वस्तुंची मोठय़ा प्रमाणात खरेदी होते. तसेच मसाल्याचे पदार्थ, सर्वच प्रकारची भांडी, खेळणी, सौंदर्य प्रसाधनांच्या वस्तुंची मोठय़ा प्रमाणात खरेदी केली जाते. मनोरंजाची साधने म्हणून पूर्वी सिनेमा थिएटर असायची. चित्रपट पाहण्याची रात्री महिलांची गर्दी असायची. मात्र आता घरोघरी टीव्हीवरील अनेक वाहिन्यांवर दिवस रात्र चित्रपटांची रेलचेल असते. त्यामुळे आता सिनेमा थिएटर यात्रेत नसतात. आता केवळ वेगवेगळ्या प्रकारच्या पालख्या, झुल्यांवर बसून आनंद करताना युवक-युवती काही हौसी मंडळी दिसते. फोटो ग्राफीतही आधुनिक तंत्रज्ञान विकसित झाल्याने तत्काळ फोटो मिळतो. त्यामुळे फोटो स्टुडिओंवरही गर्दी उसळते. यात्रेत रसवंती, उपहारगृहे, लहान मोठे स्टॉल्स, पान टप:या, कोठय़ा तसेच शेतीची अवजारे विक्रीची दुकानेही थाटण्यात आली आहेत.यात्रेत भिका-भिमा सांगावी, अंजली नाशिकर, रघुवीर खेडकर तथा कांताबाई सातारकर या तमाशा मंडळांनीही हजेरी लावल्याने यात्रे करूंचे चांगलेच मनोरंजन होत आहे. पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मंदाणे यात्रेत खरेदीसाठी यात्रेकरूंची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 12:11 PM