लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : 15 दिवसांपूर्वी सातपुडा पर्वत रांगांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर आता सातपुडय़ातील पर्वतरांगा हिरवळीने नटल्या आहेत. त्यामुळे सातपुडय़ातील पर्यटनस्थळे गर्दीने फुलू लागली आहेत. दरम्यान, पर्यटकांची गर्दी होत असली तरी त्यांच्यासाठी येथे पुरेशा सुविधा नसल्याने गैरसोय होत असून पर्यटन विभागाने लक्ष घालून सातपुडय़ातील पर्यटन स्थळे विकसीत करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.सातपुडा पर्वत रांगात पहिला पाऊस झाला की पर्वत रांगांवर गवत व नवीन झाडे-झुडुपे उगवतात. त्यामुळे सातपुडय़ावर हिरवी चादर आच्छादली गेल्याचा भास होतो. याशिवाय पावसाने जोर पकडल्यानंतर चांदसैली, देवगोई, दहेल या घाट परिसरात दाट धुके पसरते. या सर्व बाबी पर्यटकांना खुणावत असून तरुणांसह अनेक पर्यटकांची पावले सातपुडय़ाकडे वळू लागली आहेत. 15 दिवसांपूर्वी सातपुडा पर्वतरांगात अतिवृष्टी झाल्याने कोठार, माकड टेकडी, चांदसैली घाट या परिसरात सकाळपासून दाट धुके पहायला मिळत आहे. दमदार पावसामुळे यावर्षी सातपुडय़ातील कोरडय़ा पडलेल्या नद्या-नाले व धबधबेही खळाळून वाहू लागले आहेत. ही सर्व नयमरम्य दृष्य व निसर्गचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी सातपुडय़ाच्या कुशीत होत आहे.खबरदारी घेणे आवश्यकहिरवाईने नटलेला सातपुडा, दाट धुके, खळाळून वाहणारे धबधबे यासारखी अनेक नयनरम्य दृष्य पर्यटकांना आपल्या कॅमे:यात बंद करण्याचा मोह आवरता येत नाही. अनेक जण मित्र-परिवारासोबत फोटोग्राफीचा आनंदही घेतात. परंतु हे सर्व करताना पर्यटकांनी खबरदारी घेणेही अत्यावश्यक आहे. सेल्फीसाठी कोणत्याही प्रकारचा आतेताईपणा हा दुर्घटनेला कारणीभूत ठरू शकतो. चांदसैली घाट हा सर्वात धोकेदायक घाट आहे. अनेक तरुण पर्यटनासाठी मोटारसायकलने येतात. सातपुडा पर्वत रांगात ठिकठिकाणी नागमोडी वळणे व जीवघेण्या दरी आहेत. अशा ठिकाणी कोणतेही स्टंट करणे हे जीवघेणे ठरू शकते. नद्या-नाले व धबधबे याठिकाणीही पर्यटकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.सातपुडा पर्वत रांगात अनेक पर्यटनस्थळे असून पर्यटनाच्या दृष्टीने त्यांचा विकास अद्याप होऊ शकलेला नाही. पावसाळ्यात नव्हे तर वर्षभर पर्यटकांना आकर्षित करतील अशी बरीच स्थळे कोठार ते धडगाव, अक्कलकुवा ते मोलगी दरम्यान आहेत. अनेक स्थळे तर सह्याद्री व कोकणातील पर्यटनस्थळांच्या तोडीची आहेत. ‘व्ह्यू पाईंट’ म्हणून ती विकसित करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे पर्यटकांना सुरक्षितपणे पर्यटनाचा आनंद घेता यावा यासाठी संरक्षक कठडे, मार्गदर्शक सूचना फलक, उभे राहण्यासाठी व बसण्यासाठी पुरेसी जागा, छत आदी बाबी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. यामुळे सातपुडय़ातील पावसाळी पर्यटनाला चालना मिळून स्थानिकांसाठी रोजगार निर्मितीही होऊ शकते. त्यासाठी पर्यटन विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची अपेक्षा पर्यटकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
हिरवाईने नटलेल्या ‘सातपुडय़ा’त पर्यटकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 12:48 PM