लोकमत न्यूज नेटवर्कम्हसावद : म्हसावद : परिसरात कोरोनाविषयी जनजागृती होऊनही ग्रामस्थांसह परिसरातील नागरिक बेजबाबदारीने फिरत आहेत. त्यांच्यावर ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी सुज्ञ जनतेने केली आहे.सोमवारी बाजाराचा दिवस असल्याने म्हसावद परिसरातील ३० ते ४० खेड्यावरील लोकं दैनंदिन व्यवहारासह बाजारहाटसाठी येतात. सर्वदूर कोरोनाने धुमाकूळ घातला असून ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात पसरायला सुरूवात झाली आहे. मात्र म्हसावद परिसरात अजून सुदैवाने कोरोनाचा शिरकाव झालेला नाही. परिणामी या भागातील जनता बेफिकीर होऊन स्वत:ला काहीच होणार नाही या आवेशात येऊन फिरत आहेत. मोटारसायकलवर चार-चार, पाच-पाच सीट बसून मास्क न लावता फिरत आहेत. सर्व नियम धाब्यावर बसवून बाजारात ना मास्क, ना सामाजिक अंतर कशाचीही तमा न बाळगता जनता फिरत आहे. तर ते पाहून ग्रामपंचायत प्रशासन व पोलीस प्रशासनही सुस्त झाले आहे. पोलिसांनीही नवलाईचे नऊ दिवस बाजारात बंदोबस्त ठेवून कार्यवाही केली. आता मात्र पोलिसांनी कानाडोळा केल्याने नागरिक बिनधास्त फिरत आहेत.ग्रामपंचायतमार्फतही दुसऱ्यांदा औषधी फवारणी करण्यात आली. मास्क व सॅनिटायझर वाटपही केले. मात्र आता ग्रामपंचायतीलाही कोरोनाचा विसर पडल्याचे दिसत आहे. याउलट येथील व्यापारी असोसिएशनने स्वत:हून तीन दिवसाचा लॉकडाऊन घेण्यास लावून स्तुत्य कामगिरी बजावली. कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी परिसरातील जनतेसह म्हसावद येथील सुज्ञ ग्रामस्थांनी कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
म्हसावदच्या आठवडे बाजारात गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 12:19 PM