लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील गोदीपूर शिवारात सुलवाडे रस्त्यावरील शेतातील ३० ते ४० पपईची झाडे अज्ञात माथेफिरुने कापून फेकल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली.शहादा तालुक्यातील गोदीपूर परिसरात गेल्या वर्षापासून अज्ञात माथेफिरुंकडून पपई, केळीची उभी पिके कापून फेकल्याच्या घटना वारंवार घडत असल्याने शेतकऱ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. ब्राह्मणपुरी येथील विजय विठ्ठल पाटील यांचे गोदीपूर शिवारात सुलवाडे रस्त्यावर शेती आहे. त्यांनी आपल्या शेतात पपई पिकाची लागवड केली आहे. अंशुमन पाटील हे मंगळवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास गेले असता त्यांना शेतातील पपईचे तीन चार महिन्याचे ३० ते ४० झाडे व ठिंबक सिंचनच्या नळ्या अज्ञात माथेफिरुंनी कापून फेकल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ विजय पाटील यांचे पुतणे हर्षल पाटील यांच्याशी संपर्क करून घटनेची माहिती देताच घटनास्थळी ते दाखल झाले व शहादा पोलिसांना घटनेची माहिती दिली. शहादा पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. याबाबत शहादा पोलीस ठाण्यात खबर देण्यात आली असून या माथेफिरुंचा पोलिसांनी बंदोबस्त करण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.
गोदीपूर शिवारात पपईची झाडे कापून नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 12:39 PM