लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील गोगापूर शिवारात शेतात ठेवण्यात आलेल्या ठिंबक सिंचनच्या पाईप व नळ्यांना अज्ञात माथेफिरुने शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास आग लावल्याची घटना घडली. या आगीत शेतकऱ्याचे एक ते सव्वालाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सविस्तर वृत्त असे की, गोगापूर येथील शेतकरी गणेश बाळकृष्ण सोनार यांचे गोगापूर शिवारात शेत आहे. त्यांनी आपल्या शेतात गहूची पेरणी केली आहे. त्याठिकाणी ३० ठिंबक सिंचनाचे बंडल तसेच पीव्हीसी पाईपचे २० नग गोळा करुन ठेवण्यात आले होते. शुक्रवारी सायंकाळी साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास अज्ञात माथेफिरूने या नळ्या व पाईपांना आग लावून पोबारा केल्याचे शेजारील शेतकऱ्यांनी संबंधित शेतकऱ्याला संपर्क करून सांगितले. घटनास्थळी शेतकरी गणेश सोनार हे आले असता त्यांना संपूर्ण ठिंबक नळ्या, पाईप जळून खाक झाल्याचे दिसून आले. त गणेश सोनार यांचे एक ते सव्वा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. गणेश सोनार यांनी या घटनेची माहिती शहादा पोलीस ठाण्यात दिली असून या माथेफिरुचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्याने केली आहे.कर्ज काढून घेतले होते ठिंबक सिंचनआधीच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आल्याने शेतकऱ्यांचा शेतमाल शेतातच पडून सडून गेला. त्यात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका सहन करावा लागला. मागील दुःख बाजूला ठेवत शेतकरी रब्बी हंगामाच्या तयारीला लागले होते. गणेश सोनार यांनी आपल्या गहू पिकात ठिंबक सिंचनाद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी कर्ज काढून पाईप व नळ्या आणल्या होत्या. त्यातच अज्ञात माथेफिरूने ठिंबक सिंचनच्या साहित्याला आग लावून पोबारा केल्याने गणेश सोनार यांना आर्थिक फटका बसला आहे .
गोगापूर शिवारात ठिंबक सिंचनच्या नळ्या व पाईपांना आग लावून नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 12:44 PM