नंदुरबार : तालुक्यातील धूरखेडा शिवारात ऊसतोडणी सुरु असताना मजूराच्या पाच वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला चढवून गंभीर जखमी केल्याची घटना २९ डिसेंबर २०१८ रोजी घडली होती़ जखमी बालकाचा ११ फेब्रुवारी रोजी उपचार घेत असताना मृत्यू झाला़ महिनाभर शहादा येथील खाजगी दवाखान्यात उपचार घेतल्यानंतर त्याला घरी पाठवण्यात आले होते़धुरखेडा शिवारातील भगवान नथू पाटील यांच्या शेतात २९ डिसेंबर रोजी ऊस तोड सुरु असताना रूपसिंग हावल्या पराडके रा़ गौऱ्यामाळ ता़ धडगाव यांचा पाच वर्षीय मुलगा तुषार पराडके याच्यावर बिबट्याने हल्ला करुन जखमी केले होते़ बिबट्याने हात आणि छातीवर चावा घेतल्याने तुषार हा गंभीर जखमी झाला होता़ त्याच्यावर शहाद्यातील खाजगी रुग्णालयात महिनाभर उपचार करण्यात आले होते़ प्रकृती बरी झाल्याने त्याला घरी पाठवण्यात आले होते़ परंतू गेल्या दोन ते तीन दिवसात प्रकृती खराब झाल्याने त्याला धडगाव येथे दाखल केले असता, त्याचा मृत्यू झाला़ याबाबत शहादा पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या खबरीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ तुषारच्या मृत्यूनंतर वनविभागाचे उपवनसंरक्षक एस़आऱचौधरी यांच्यासोबत संपर्क केला असता बालकाच्या मृत्यूची माहिती घेऊन त्याच्या वारसांना योग्य ती मदत करण्यात येणार आहे़ याबाबत संबधित रुग्णालयाचा शवविच्छेदन अहवाल मागवला असल्याची माहिती दिली़ तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल वंतू गावीत करत आहेत़
धुरखेडा येथे बिबट्याच्या हल्ल्यातील जखमी पाच वर्षीय बालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 6:40 PM