रमाकांत पाटील, नंदुरबार: आरोग्य केंद्रात डॉक्टर नसल्याने सर्पदंश झालेल्या व्यक्तीला वेळेवर उपचार मिळू शकला नाही. त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप खडकीचा छापरीपाड्यातील ग्रामस्थांनी केला. झापी आरोग्य केंद्रात हा प्रकार रविवारी घडला. दरम्यान, शवविच्छेदनासाठी देखील वाहन न मिळाल्याने १८ तास मृतदेह घरातच पडून होता.
धडगाव तालुक्यातील खडकीच्या छापरीपाड्यातील बिट्या खेत्या नाईक (४०) हे शेतात नांगरत असताना त्यांना उजव्या गालावर सर्पदंश झाला. त्यांच्या वडिलांच्या लक्षात ही बाब येताच, त्यांनी तातडीने गावकऱ्यांच्या मदतीने उपचारासाठी झापी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात, तसेच खडकी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात त्यांना उपचारासाठी नेण्यात आले, परंतु दोन्ही ठिकाणी डॉक्टरच नसल्याने, त्यांच्यावर घरीच उपचार करावा लागला. त्यात त्यांचा मृत्यू झाला.
शवविच्छेदनासाठी तोरणमाळ येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यासाठी वाहनाची सोय नसल्याने, १८ तास मृतदेह घरीच ठेवावा लागल्याचे भयावह वास्तवही समोर आले आहे. दरम्यान, झापीच्या सरपंच गीता जयराम पावरा यांनी या घटनेची चौकशी करावी व आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नेमावा, अशी मागणी केली आहे. या आरोग्य केंद्राला गटविकास अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी भेट दिली असता तेव्हा देखील वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते. तेव्हाच कारवाई झाली असती तर आज ही वेळ आली नसती असे बोलले जात आहे.